पलटवार – त्यांची लायकी नाही, अकलेची कीव येते, ज्ञान संस्कार नाहीत
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील यांना फटकारले
उस्मानाबाद – समय सारथी
पीक विम्याच्या श्रेयावरून उस्मानाबाद जिल्ह्यात आरोप- प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या आरोपानंतर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पलटवार केला आहे. या सर्वाना उत्तर देण्याची लायकी नाही त्यांच्या अकलेची कीव येते, ज्ञान व संस्कार नाहीत. ते त्यांच्या संस्कार प्रमाणे वागतात. त्यांना काही इंग्रजी शब्द उच्चारता येत नाहीत त्यांच्याशी मी काय चर्चा करणार असे सांगत आमदार राणा यांनी या तिघांना फटकारले. माझ्यावर जे आरोप केले आहेत त्यात तथ्य नसून न्यायालयाने दिलेले निकाल, घटनाक्रम, तारीख याचा अभ्यास करावा असा सल्लाही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना 1200 कोटी दिवाळीपूर्वी न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनाच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिला होता यावर बोलताना आमदार राणा म्हणाले की, गेली 3 वर्ष सरकार असताना त्यांनी काय दिवे लावले हे सर्वांना माहित आहे, इतके दिवस का आंदोलन केले नाही. त्यांनी आता तरी जागे व्हावे ही चांगली गोष्ट आहे. आम्ही सर्व कामे करीत आहोत त्यामुळे मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीची गरज नाही, त्यांनी फक्त वाट पाहावी असे म्हणाले. असले लोकप्रतिनिधी असतील तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे योग्य वाटत नाही असे म्हणत त्यांनी विषय संपवीला.
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 1200 कोटी रुपये कसे येतील यासाठी आपण प्रयत्न करीत असून स्वतः सुप्रीम कोर्टात गेलो. कृषी अधिकारी तिथे दिल्लीत असून सोमवार किंवा मंगळवारी पर्यंत पीक विम्याचे पैसे डीडी किंवा चेक मिळणे अपेक्षित आहे. विमा कंपनी व राज्य व केंद्र सरकार यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. 2021 च्या नुकसानीचे पैसे न दिल्याने विमा कंपनी विरोधात फौजदारी गुन्हा का नोंद करण्यात येऊ नये अशी नोटीस जिल्हाधिकारी यांनी पाठविण्याचे ठरले आहे.
सततच्या पावसाने झालेले नुकसानसाठी खास बाब म्हणून भरपाई देण्याचे ठरले असून 153 कोटी पहिली यादी झाली असून दुसरी यादी बनविणे सुरु आहे त्याचे अधिकचे 250 कोटी येतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, सरकार आपल्या हक्काचे आहे
निसर्गावर कोणाचेही नियंत्रण नाही. परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे त्यामुळे खचून जाण्याची गरज नाही. पीक विमा व इतर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करीत असून शेतकरी बांधवाना आत्महत्या न करण्याची विनंती आमदार राणा पाटील यांनी केली. शिंदे फडणवीस सरकार हे आपले शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे व ते मदत करणारे आहे. एक एक विषय आपण पूर्ण ताकतीने मार्गी लावत आहोत. दिवाळी पूर्वी मदत मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा, सरकार संवेदनशील असून जलद गतीने काम करीत आहे असे ते म्हणले.