धाराशिव – समय सारथी
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शुभेच्छाच्या बॅनरवरून अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांचा फोटो गायब आहे, कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे व शिक्षक आमदार विक्रम काळे यांना देण्यात आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांना स्थान देण्यात आले नाही. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी पक्षाच्या वतीने शुभेच्छा बॅनर धाराशिव शहरात अनेक ठिकाणी लावले आहेत.
भाजपने लोकसभेतील पराभवाची मिमांसा करण्यासाठी पक्षाची चिंतन बैठक बोलावली होती त्या बैठकीला अर्चना पाटील यांना निमंत्रण नव्हते तरी देखील त्या आमदार पत्नी या नात्याने उपस्थितीत राहिल्या होत्या. त्याच्या बैठकीतील हजेरीवरून बराच वाद झाला होता, पुढील बैठकीला एकतर अर्चना पाटील यांना भाजपात प्रवेश घेऊन रीतसर बोलवा अथवा विना निमंत्रण किंवा विना पक्षप्रवेश भाजप बैठकीला आल्या तर आम्ही बैठकीतून निघुन जाऊ असा इशारा जुन्या भाजप पदाधिकारी यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या बॅनरवर राज्य पातळीवरील नेत्याचे फोटो आहेत त्यात सुरेश बिराजदार, सुरेश पाटील यांचा देखील समावेश आहे.
अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात भाजपमधुन राष्ट्रवादीत प्रवेश करीत घड्याळ या चिन्हावर निवडणुक लढवली हे सगळ्यांना माहिती आहे, मात्र निवडणुकीनंतर त्या पक्षाच्या कोणत्याही स्थानिक बैठक किंवा कार्यक्रमाला हजर नाहीत, त्यांनी पक्षवाढीसाठी कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाहीत मात्र त्या भाजप पक्षाच्या बैठकीला जातात त्यामुळे आम्हीच संभ्रमात आहोत की अर्चनाताई नेमक्या कोणत्या पक्षात आहेत. त्यांनी याबाबत खुलासा करावा. लोकसभा निवडणुकीत आम्ही स्वतः उमेदवार असल्यासारखे विरोधक यांच्यावर तुटून पडलो, मतभेद बाजूला ठेवून अर्चना पाटील यांची उमेदवारी स्वीकारली आता त्यांनी पक्षाबाबत भुमिका स्पष्ट करावी असे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे बॅनर व फोटो प्रश्नावर म्हणाले.