धाराशिव – समय सारथी
भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वाढदिवस साजरा करताना विधानभवनाची केकमधील प्रतिकृती तयार करण्यात आली होती, केक कापुन डॉ पद्मसिंह पाटील यांनी मल्हार पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी काका पृथ्वीराज पाटील, बंधु मेघ पाटील असा परिवार उपस्थितीत होता.
विधानभवनाची प्रतिकृती व गेल्या काही वर्षातील मल्हार पाटील यांचे राजकीय नेतृत्व व त्यांनी हातात घेतलेली राजकारणातील धुरा पाहता ते आमदारकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अनेक गावात स्वतंत्र प्रचार सभा, रॅली काढली तर आक्रमक व रोखठोक भाषणातुन टीका केली, मल्हार पाटील यांना मेघ पाटील यांची सुद्धा साथ मिळत असून ही भावा भावांची जोडी सध्या ग्रामीण भागात कार्यकर्ते यांची बांधणी करीत आहे. या दोघांच्या कार्यकर्ते यांची वेगळी टीम आहे. वाढदिवसाच्या दिवशी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भावी आमदार असे म्हणत केक कापत मल्हार यांना शुभेच्छा दिल्या.
मल्हार पाटील हे गेली 10-12 वर्षांपासुन राजकारणात सक्रीय असून त्यांनी विधानसभा,लोकसभा, स्थानिक निवडणुकीत सहभाग घेतला आहे शिवाय तेरणा ट्रस्ट व हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरु आहे. राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांचे नातु, आमदार राणाजगजीतसिंह पाटील व अर्चना ताई यांचे पुत्र असा राजकीय वारसा त्यांना असून राजकारणाचे बाळकडू लहानपणापासून घरातून मिळाले आहेत. जुने व नवीन कार्यकर्ते मल्हार पाटील यांच्यात डॉ पद्मसिंह पाटील यांचे नेतृत्व, रोखठोकपणा व वक्तृत्व असे अनेक गुण आणि भावी नेतृत्व म्हणून पाहतात.
आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर आल्या असुन मोर्चेबांधणी व चाचपणी सुरु आहे. तत्कालीन स्तिथी पाहून मल्हार पाटील हे धाराशिव – कळंब किंवा तुळजापूर विधानसभा मतदार संघात उभे राहू शकतात अशी शक्यता असुन त्यादृष्टीने त्याची राजकीय वाटचालही दिसत आहे.