अटकपूर्व जामीन मंजुर – कामगार कार्यालयातील घोटाळा प्रकरणी पाशा शेख यांना दिलासा
22 ते 31 ऑक्टोबर दरम्यान रोज होणार चौकशी – दलालांच्या नावाची चर्चा, रॅकेट उघड होणार का ?
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद येथील जिल्हा कामगार कार्यालयातील घोटाळा प्रकरणी तक्रारदार तथा आरोपी असलेले मनसेचे पाशा शेख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने सशर्त मंजुर केला आहे त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. 22 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या 10 दिवसांच्या काळात दररोज सकाळी 10 ते 12 या 2 तासाच्या वेळेत शेख यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून तपास कामात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. कामगार कार्यालयातील घोटाळ्यात लाचलुचपत विभागाने चौकशी करुन 10 जणावर गुन्हा नोंद केला आहे.
प्रथम दर्शनी तक्रारदार पाशा शेख हे 2017 पासून सातत्याने सरकारी अधिकारी यांनी हा घोटाळा केल्याच्या तक्रारी करीत असल्याचे मत न्यायालयाने निकालात नोंदविले आहे. गुन्हा नोंद करीत असताना शेख यांना या घोटाळ्यातील रकमेचा आर्थिक फायदा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे मात्र ते सरकारी नौकर नाहीत शिवाय ते समाज सेवक आहेत. शेख यांना जामीन देताना काही अटी टाकल्या आहेत तसेच त्यांनी पुरावे किंवा साक्षीदार यांच्यावर दबाव आणू नये असे निकालात म्हंटले आहे.
शासनाची योजना हडप करण्याच्या उद्देशाने बनावट व खोटी कागदपत्रे तयार करुन बोगस कामगारांची नोंद करुन अनुदान लाटल्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह फसवणूक व विविध कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी जे व्ही मिटके, एस आर सोलंकर, अजिंक्य पवार, एम आर काकडे, ए ए देशपांडे, एस जी वैद्य, जी एस राऊत या 7 अधिकारी व घोटाळ्यात सहभागी असलेले प्रमोद रामचंद्र कुलकर्णी (उंबरे कोठा, उस्मानाबाद), सय्यद अतीखउल्ला हुसेनी असदउल्ला हुसेनी( खाजा नगर, उस्मानाबाद) व पाशुमिया बाबुलाल शेख (महाळंगी, तालुका उस्मानाबाद) यांचा समावेश आहे.
शासनाच्या मालमत्तेची अफरातफर करण्यासाठी या 10 जणांनी संगणमत करुन खोटे व बनावट कागदपत्रे तयार केली व त्याचा लाभ घेण्यासाठी वापर केला व प्राथमिक तपासात 2 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली तसेच घोटाळा केल्यानंतर तो उघड होऊ नये यासाठी पुराव्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेली काही कागदपत्रे नष्ट केली असे तपासात उघड झाले. 1 जानेवारी 2015 ते 31 डिसेंबर 2017 या काळात हा घोटाळा घेतला असून तो खोदण्यात लाचलुचपत विभागाला यश आले आहे. हे एक उदाहरण असून या अनुषंगाने संपूर्ण तपास करावा अशी मागणी पाशा शेख यांनी केली आहे.
चौकट पाशा शेख फोटो यात वापरणे
जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील घोटाळ्याप्रकरणी सखोल चौकशी करण्याच्या तक्रारीवर 12 ऑक्टोबर रोजी लोकायुक्त यांच्याकडे ऑनलाईन सुनावणी झाली यात तक्रारदार मनसेचे पाशा शेख यांना त्यांचे म्हणणे लेखी सादर करण्यास सांगितले आहे त्यामुळे लोकायुक्त काय निर्णय देतात याकडे लक्ष लागले आहे. उस्मानाबाद येथील कामगार कार्यालयात विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस कामगार नोंदणी व बोगस लाभार्थी दाखवून 30 कोटी पेक्षा जास्त रकमेचा अपहार अधिकारी व दलाल यांनी केल्याची तक्रार शेख यांनी केली आहे. या घोटाळ्यात उस्मानाबाद शहरातील काही दलाल, संघटनाचे पदाधिकारी सहभागी असून लवकरच त्यांचा नावासहित व पुरावेसह भांडाफोड करणार असल्याचे शेख यांनी सांगितले. या सर्वांची नावे, अधिकारी यांनी कसा घोटाळा केला हे तपासात सांगणार असून ते दलाल व अधिकारी कोण याची चर्चा चांगलीच रंगली आहे तर या प्रकरणात काही जणांनी तक्रारी केल्या आहेत