धाराशिव – समय सारथी
नीट परीक्षा घोटाळ्याच्या तपासाला आता गती येताना दिसत असून या परीक्षा घोटाळ्यातील तपासाचे धागेदोरे धाराशिव जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत, नांदेड येथील ATS पथकाने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील 2 जणांना ताब्यात घेतले असून अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई सुरु आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी त्यांची चौकशी सुरु असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे. डार्क नेटच्या माध्यमातून ही पेपरफुटी झाल्याची माहिती तपासात समोर आली होती त्यानंतर देशभर याचा तपास सुरु आहे.
ईरन्ना मष्णाजी कोनगलवार ( कर्मचारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरगा ) असे ताब्यात घेतलेल्या एकाचे नाव असून त्याला आरोपीनी व्हाट्स ऍपवर प्रश्नपत्रिका पाठवली त्यानंतर हा व्यक्ती दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आला आणि त्याच्या माध्यमातून नीटचा पेपर फोडण्यात आल्याची कबुली लातूर येथील अटक आरोपी संजय जाधव याने दिली त्यानंतर धाराशिवमध्ये कारवाई करण्यात आली आहे. लातूर येथून हे पैसे धाराशिवला पाठवण्यात आले त्यानंतर ते पुन्हा दिल्लीला पाठवले असल्याचे समोर आले आहे.
लातुरातील शिक्षकांकडे आढळले नीटच्या 12 विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड सापडले असून आतापर्यंत 4 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह एकाला अटक केली आहे.संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नाव आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. एक शिक्षक लातूर आणि एक सोलापुरात कार्यरत आहेत. लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवाशी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते कार्यरत आहेत. लातूरच्या अंबाजोगाई रोड भागांत राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत
एटीएसच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आली असून, त्यात एटीएसने चौकशी केलेल्या दोन शिक्षकांनाही आरोपी केले आहे. पोलिसांनी हा एफआयआर आयपीसीच्या कलम 420 आणि 120 (बी) आणि सार्वजनिक परीक्षा (प्रतिबंध आणि अन्यायकारक) च्या संबंधित कलमांखाली नोंदवला आहे.