उपजिल्हा रुग्णालयासह स्त्री रुग्णालय उभारले जाणार – आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा मतदारसंघातील शासकीय आरोग्यसेवा बळकट करण्याच्या आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. सावंत यांच्या पुढाकारातुन परंडा व भूम रुग्णालयाच्या जागा हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयासह स्त्री रुग्णालय उभारले जाणार आहे.आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या प्रयत्नामुळे धाराशिव जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा व आरोग्यसेवेला बळकटी मिळत असून श्रेणीवर्धनसह अनेक ठिकाणी नवीन आरोग्य केंद्र मंजुर झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.
भुम व परंडा येथे प्रत्येकी 100 खाटांचे उपजिल्हा व स्त्री रुग्णालय, भूम येथे मंजूर केले. इमारत उभारणीचे कामही सुरू झाले होते. मात्र गोदावरी मराठवाडा पाटबंधारे व कृष्णा खोरे महामंडळाकडून जागा हस्तांतरित झालेली नव्हती. हा प्रश्नही आता निकाली निघाला असून, जागा हस्तांतरणास 19 जून रोजी मंजुरी देण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणच्या जागेसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सुमारे साडे सतरा कोटी रुपये मोजणार आहे. गोरगरीब लोकांना ऐपत नसतानाही बार्शी, जामखेड, बीड येथे जाऊन खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत होते. डॉ सावंत हे आरोग्यमंत्री झाल्यावर त्यांनी आरोग्याची स्तिथी सुधारण्यासाठी प्राधान्य देत प्रयत्न सुरु केले त्याला यश मिळत आहे.
परंडा येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी दिली तर भूम येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले. भूम येथील जलसंपदा विभागाच्या बाणगंगा वसाहतीतील 0.68 हेक्टर जागेवर बांधकामही सुरू करण्यात आले आहे. परंड्यातही सीना कोळेगाव वसाहतीतील 5 हेक्टर 22 आर क्षेत्रात इमारत उभारणीचे काम सुरू आहे. मात्र ही जागा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळ आणि कृष्णा खोरे महामंडळाकडून हस्तांतरित झालेली नव्हती. याबाबत आरोग्यमंत्री सावंत यांनी युद्धपातळीवर कार्यवाही करीत जागा हस्तांतरणास प्रशासकीय मान्यता घेतली. या जागेपोटी सार्वजनिक आरोग्य विभाग सुमारे साडेसतरा कोटी रुपये दोन्ही महामंडळांना मोजणार आहे.
जागा हस्तांतरणाचा प्रश्न निकाली निघाल्याने इमारत उभारणीचे काम अधिक गती होईल.भूमसाठी 4 कोटी, परंड्यासाठी 13.46 कोटी असे 17.46 कोटी द्यावे लागणार आहेत.दोन्ही ठिकाणच्या दवाखान्यांच्या जागा हस्तांतरणाची प्रक्रिया 60 दिवसांच्या आत पूर्ण करावी लागणार आहे.