कुंडल्या माझ्याकडे, हळूहळू एक एक फाईल ओपन होणार – ते पाप माझेच, आम्ही शेण खायचे का ?
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचा खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांच्यावर हल्लाबोल
उस्मानाबाद – समय सारथी
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी कळंब येथील कार्यक्रमात शिवसेनाच्या ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर कडाडून टीका केली. सगळ्याच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. एक एक फाईल, एक एक कुंडली हळूहळू ओपन होणार आहे. साहेब पैसे नाही खायचे तर काय शेण खायचे का ? असे हे नेते म्हणत असे असा गौप्यस्फ़ोट मंत्री सावंत यांनी केला.
हे पण मलाच पाहिजे, ते माझ्या भावाचे. कॉन्ट्रॅक्ट पण मलाच पाहिजे, प्लॉटिंग माझीच, अनधिकृत काम माझेच. इथले स्टोन क्रशर बंद पाडले व सोलापूर येथील स्टोन क्रशर मध्ये भागीदारी केली. हे काय सुरु आहे, ही कुठली पद्धत आहे काम करण्याची, त्यांना वाटते की हे कुणाला कळत नाही पण सगळ्याच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. एक एक फाईल, एक एक कुंडली हळूहळू ओपन होणार आहे, फक्त दिवाळी सुखाची जाऊ दिली आहे. दिवाळी झाल्यावर ह्यांचा मुक्काम कुठे हे यांच्या फाईल ठरवतील, ते आपण ठरवायचे कारण नाही त्यामुळे दोन अडीच वर्षात काय केले यांचे आत्मचिंतन करा असे सावंत म्हणाले. ते पाप पण माझेच होते, हे पाप तुमच्या डोक्यावर परत 2024 साली लादु देणार नाही इतके आश्वासन मी देतो असे सावंत भाषणात म्हणाले.
मी जेव्हा त्यांचा नेता होतो तेव्हा त्यांना मी वारंवार असे करू नका असे कार्यालयात आल्यावर हातापाया पडून सांगत होतो. कमी पडले तर मला सांगा मी आहे ना? निवडणुकीत तुमचा स्वतःचा चहाचा कप सुद्धा गेला नाही तेव्हा तुम्ही हे कशासाठी करीत आहोत, तेव्हा ते म्हणायचे साहेब पैसे नाही खायचे तर काय शेण खायचे का ? असा गौप्यस्फ़ोट सावंत यांनी खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांच्याबाबत जाहीर भाषणात केला.
एकाला पुढे पाठवायचे व अधिकारी यांच्याकडून हप्ते मागायचे ही वृत्ती आमची नाही. माझे हात देणाऱ्याचे आहेत, जिथं कमी तिथं आम्ही म्हणून खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी शिकवायच्या भानगडीत पडू नये. त्यांचे फक्त दीड वर्षाचे दिवस राहिले असून आम्ही 2024 ची वाट पाहत आहोत. ग्रामपंचायत पासून आमदार खासदार हे बाळासाहेबांची शिवसेना व भाजपमय असतील असा विश्वास मंत्री सावंत यांनी व्यक्त केला.
पाठीत वार करणारा तानाजी सावंत नाही, मी समोर सांगून वार करतो. वेळ जास्त गेला पण मी सत्तातर करुन दाखवलं असे सावंत म्हणाले.जनतेच्या हृदयातील हिंदूंना व मोदींना मानणारे सरकार आणून दाखविले. आम्ही 40 आमदारांनी पाठीत खंजीर खूपसला नाही तर तुम्ही खूपसला असे सांगत मंत्री सावंत यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. तुम्ही ज्या वेळेस त्यांच्या मांडीवर जाऊन बसले त्यावेळी तुम्हीच आमच्या पाठीत खंजीर खूपसला असे ते म्हणाले. आम्ही फक्त वाकडे झालेले सरळ केले.मी 2020 ला काय करणार हे सगळ्यांना माहित होते याची सुरुवात माझ्यापासून झाली असे सावंत म्हणाले.
2020 ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला जिल्ह्याचा कारभारी केला. 2020 मध्ये विमा कंपनीने देणे गरजेचे होते.आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा विमावाला आमदार असा उल्लेख मंत्री सावंत यांनी केला, आमदार राणा हे तेव्हापासून विम्यासाठी भांडत आहेत तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात, तुम्ही जिल्ह्याचे कारभारी होतात तेव्हा 2020 साली हे सगळे उपोषण व आंदोलन का सुचले नाही असा प्रश्न मंत्री सावंत यांनी उपस्थित केला.
2020 व 2021 मध्ये विमा वेळी पण तुम्ही गप्प का होता असा सवाल त्यामुळे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांना केला. 2022 साली सरकार बदलल्यावर आजच्या स्तिथीच्या मागणीवर तुम्ही आंदोलन धरणे केले असते तर ते आम्ही मान्य केले असते पण तुम्ही तुमच्याच 2020 व 2021 च्या निर्णय विरोधात आंदोलन करीत आहेत त्यामुळे सदसदविवेक बुद्धी जागृत ठेवा, जनता दूधखुळी नाही त्यांना ही नौटंकी दिसते असे सावंत म्हणाले. फुगा फुटायच्या अगोदरची ही शेवटची धडपड आहे. आम्ही विकासाच्या मार्गाने जात असून विकासाचा हायवे तयार केला आहे. रात्रीचा दिवस करुन आम्ही काम करीत आहोत. आम्ही एका घरातून कॉम्प्युटर व झूम मधून मीटिंग नाही घेतल्या असे सांगत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. मुख्यमंत्री यांच्या वर्षावर अनेक लोक असतात मात्र गेली अडीच वर्षात आमदारांना वर्षा माहित नव्हती ही वस्तुस्तिथी आहे असे सावंत म्हणाले.
जिथे हप्ते खायची भाषा असेल, दिलेले आयते युनिट चालवता येत नाही ते स्टार्टअप काय करणार. आंदोलन, उपोषणाची नौटंकी करू नका, पीक विम्याचे राहिलेले पैसे मिळणार आहेत त्याबाबत जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत. ज्यांनी कर्ज फेडले त्यांचा प्रोत्साहनपर रक्कम असलेले 60 कोटी रुपये आजच उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्राप्त झाले असून त्याचे वाटप सुरु झाले आहे. हे खोटे नसून नौटंकी नाही. मी जे आहे ते खरं बोलतो हे गतिमान सरकार आहे, आम्ही विकासासाठी बांधील आहोत. रोजगार देणारे आहोत असे ते म्हणाले. कळंब येथे अतिरिक्त एमआयडीसी बाबत बैठक घेऊ व उपजिल्हा रुग्णालयाचे आधुनिकीकरण करण्याची घोषणा सावंत यांनी केली.
भारतातले हे पाहिले उदाहरण आहे, 2008 मध्ये जून नव करुन पहिला 1250 टन क्रशिंगचा कारखाना सुरु केला व 9 वर्षात 5 साखर कारखाने उभे केले. मनी लॉंड्रीग केले का? दोन नंबरचे पैसे आणून टाकले का? मी सरकारी गुत्तेदार होतो का? शे पाचशे कोटी काढले व त्यातून व्हाईट करण्यासाठी हे सुरु केले का? आम्ही कष्ट केले, कर्ज काढली आणि आता हे सांगत आहेत भैरवनाथने शेजारील कारखाना इतका दर द्यावा. हे सगळे जगले भैरवनाथच्या जीवावर, ज्यांनी भंगार विकले, ज्यांना साखर कारखानदारी माहित नाही ते सुद्धा बोलायला लागले. आयते हातात आलेले युनिट ज्याला चालवता आले नाही त्यांनी मला शिकवायचे भाव कसा द्यावा. हे आश्चर्यकारक आहे असे सांगत त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे कान टोचले. मी कोरोना काळात काय केले व तुम्ही काय केले हे जनतेला माहित आहे.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान आता देशभर राबविले जाणार असून पुढील महिन्यात केंद्र सरकारचे पथक राज्यात येणार आहे.माता सुरक्षित अभियान अंतर्गत 2 कोटी महिलांची तपासणी केली आहे. पंतप्रधान यांनी सीमा सुरक्षित तर देश सुरक्षित ही टॅग लाईन वापरली त्याच धर्तीवर हे अभियान देशभर राबविले जाणार असल्याचे तानाजी सावंत यांनी सांगितले