मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध, तुळजाभवानीची कवड्याची माळ कार्याला अर्पण
धाराशिव – समय सारथी
शिष्टमंडळावर विश्वास दाखविल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आभार मानले आहेत तसेच मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे असे सांगितले, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी जारांगे यांची अंतरवली सराटी येथे भेट घेत त्यांच्या मराठा समाजाच्या कार्याला शक्ती मिळावी यासाठी कवड्याची माळ कार्याला अर्पण केली व आभार मानले.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उपोषणामुळे खालावत चालली होती. मराठा समाजाच्या जनभावना राज्य सरकारने ध्यानात घेऊन तत्काळ प्रश्न मार्गी लाऊन मराठा समाजाचे आरक्षण जाहीर करणे आवश्यक असल्याची बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली त्यानुसार मुख्यमंत्री यांनी राज्य सरकारच्या वतीने शिष्टमंडळ पाठविले त्यात आमदार पाटील सहभागी झाले होते.
शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी सकारात्मक संवाद साधला आणि मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार अतिशय सकारात्मक पध्दतीने काम करणार असल्याची ग्वाही दिली. पुढील महिनाभरात त्याअनुषंगाने सर्व प्रक्रियांची पूर्तता केली जाईल. आमदार पाटील व आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्य सरकारने सकारात्मक संवाद करणे अत्यावश्यक असल्याची विनंती केली होती. त्यानुसार गुरूवारी मुख्यमंत्री यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या नेतृत्वाखाली खासदारbसंदिपान भुमरे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, आमदार मेघना बोर्डीकर यांचे शिष्टमंडळ सरकारच्या वतीने बोलणी करण्यासाठी अंतरवाली सराटी येथे पाठविले होते.
शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्यासोबत सर्वच मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. सरकार अतिशय सकारात्मक असल्याचे सांगत सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली पाऊले उचलण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीतील आचारसंहितेमुळे प्रक्रियेला उशिर झाला असला तरी पुढील महिनाभराच्या कालावधीत आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातील आणि जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे सगेसोयरे अंमलबजावणी तातडीने केली जाईल, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील आणि न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया रबाविण्यात येईल. त्यासाठी शुक्रवार पासूनच मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल.
उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथे रूग्णाललयात दाखल केले असून रुग्णालयात जाऊन त्यांची आमदार पाटील यांनी भेट घेऊन डॉक्टरांसोबत चर्चा केली. जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचे कोणतेही कारण नाही.राज्य सरकारच्यावतीने केलेली विनंती मान्य करून उपोषण स्थगित केल्याबद्दल मनोज जरांगे यांचे आमदार पाटील यांनी आभार मानले.