धाराशिव – समय सारथी
2024 च्या धाराशिव लोकसभेचा निकाल जाहीर झाला असुन डॉ पद्मसिंह पाटील यांच्या परिवाराला सलग तिसऱ्या वेळेस पराभव पत्कारावा लागला आहे. डॉ पाटील परिवाराने 2009 पासुन गेल्या 2 दशकात सलग 4 वेळेस धाराशिव लोकसभा लढविली आहे. त्यात 2009 चा विजय वगळता 2014, 2019 व त्यानंतर 2024 असा सलग 3 वेळेस पराभव झाला आहे, त्यातील 2 वेळेस ओमराजे निंबाळकर यांनी पराभव केला आहे. मागील 4 लोकसभेत पाटील परिवाराचा सामना शिवसेनेशी होत आहे. पक्ष बदलला तरी पाटील परिवाराला लोकसभेत अपेक्षित मिळत नसुन पदरी निराशा मिळत आहे.
सुरुवातीला डॉ पद्मसिंह पाटील त्यानंतर राणाजगजीतसिंह पाटील व आता अर्चना पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ पाटील यांनी सुरुवातीला नशीब अजमाविले त्यात डॉ पाटील यांचा केवळ 6 हजार 787 मतांनी विजय मिळाला. शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांना 4 लाख 2 हजार 53 तर राष्ट्रवादीचे डॉ पाटील यांना 4 लाख 8 हजार 840 मते मिळाली.
2014 मध्ये शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांनी डॉ पाटील यांचा 2 लाख 34 हजार 325 मतांनी पराभव केला त्यावेळी मोदी लाट देशभर होती, गायकवाड यांना 6 लाख 7 हजार 699 तर डॉ पाटील यांना 3 लाख 73 हजार 374 मते पडली.
2019 मध्ये राणाजगजीतसिंह यांचा शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांनी 1 लाख 27 हजार 566 मतांनी पराभव केला. ओमराजे निंबाळकर यांना 5 लाख 96 हजार 640 व राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना 4 लाख 69 हजार 74 मते मिळाली, ओमराजे यांना 49.5 टक्के तर राणाजगजीतसिंह पाटील यांना 38.9 टक्के मते मिळाली होती.
2024 च्या निवडणुकीत शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांचा 3 लाख 29 हजार 846 मतांनी पराभव केला. ओमराजे निंबाळकर यांना 7 लाख 48 हजार 752 इतकी मते मिळाली तर अर्चना पाटील यांना 4 लाख 18 हजार 906 इतकी मते मिळाली आहेत. ओमराजे निंबाळकर यांना 58.38 % मते तर राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना 32.66 % मते पडली.