धक्कादायक – आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाकडून पैसे घेतल्यावरच केले शवविच्छेदन
मढ्याच्या टाळुवरील लोणी खाणे काय याचा आला शेतकरी कुटुंबाला प्रत्यय
फोन पेवर घेतले 1500 रुपये – रुग्णालयातील खासगी व्यक्तीने घेतले पैसे
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून नापीकी व कर्जबाजारीपणा यामुळे वैतागून आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याचे शवविच्छेदन करण्यासाठी 1 हजार 500 रुपये घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे पैसे फोनपे वर घेण्यात पैसे घेतल्याशिवाय शवविच्छेदन केले नाही. पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयातील हा प्रकार असून तेथील डॉक्टर यांच्या समक्ष पैसे घेण्यात आले. मढ्याच्या टाळुवरील लोणी खाणे म्हणजे काय असते याचा प्रत्यय या शेतकरी कुटुंबाला आला. या प्रकारावर टीका होत असून संबंधीत व्यक्ती व डॉक्टर यांच्यावर कारवाईची मागणी या कुटुंबाने केली आहे. पैसे मागतानाचा हा प्रकार कॅमेरात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरु असून उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील लक्ष्मण दगडू वाघे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचे प्रेत सोलापूर जिल्ह्यातील पांगरी येथील रुग्णालयात नेण्यात आले तिथे या कुटुंबाला रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम करणाऱ्या बगाडे नावाच्या एका खासगी व्यक्तीने 2 हजार 500 रुपयांची मागणी करण्यात आली. अगोदरच अस्मानी संकटाने आर्थिक अडचणीत आलेल्या या कुटुंबाने गयावया केल्यानंतर या व्यक्तीने 1 हजार रुपये कमी केले व 1 हजार 500 रुपये फोनपे वर घेतले. हा सगळा प्रकार आपबिती सांगताना या कुटुंबाला अश्रू अनावर झाले.
हतबल झालेल्या या कुटुंबाने पैसे देण्यापूर्वी अनेक जणांना फोन करीत शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पैसे मागत असल्याचे सांगितले मात्र एकालाही या कुटुंबाची दया आली नाही. पूर्वी सोलापूर जिल्ह्यात असलेले कारी हे गाव आता उस्मानाबाद तालुक्यात येत असून पोलीस ठाणे व रुग्णालय हे सोलापूर जिल्ह्यातील पांगरी येथे येत असल्याने काही अधिकारी यांनी ही पळवाट शोधत जबाबदारी झटकून हात वर केले. रात्र होत असल्याने वेळेत अंत्यसंस्कार करणे गरजेचे असल्याने हतबल होत अखेर त्या व्यक्तीला दीड हजार दिले व त्यानंतर शवविच्छेदन करुन प्रेत ताब्यात घेतले व रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले.
वाघे कुटुंबाने पैसे नसल्याने दिवाळी सण साजरा केला नाही त्यांच्या व्यथा सांगताना त्यांचे दुःख अनावर झाले. त्याच्या शेतात आजही पाणीच पाणी साचले असून सोयाबीन पाण्यात असल्याने मोठे नुकसान झाले आहे.