अपहार – उस्मानाबाद जनता बँकेत एका क्लार्कने घातला घोळ, खातेदारांचे लाखो रुपये परस्पर काढले
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत एका क्लार्कने अपहार केल्याचे बँक चौकशीत उघड झाले असून अनेक खातेदार यांचे लाखो रुपये त्याने बोगस सह्या करुन परस्पर काढले आहेत. आनंद निंबाळकर असे या लिपिकाचे नाव असून त्याने 35 लाखांचा अपहार केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे तर आणखी काही व्यवहार संशयस्पद असून त्याची चौकशी बँक अंतर्गत ऑडिट विभागाकडून सुरु आहे.
बँकिंग क्षेत्रात नामांकित असलेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत निंबाळकर नावाच्या एका लिपिकाने अत्यंत नियोजनबद्ध कट रचित घोटाळा केला आहे. बँकेतील काही खातेदार यांची बोगस सही करुन पैसे काढून घेतले आहेत. निंबाळकर यांच्यावर खातेदार यांचे चेक पास करुन पैसे देण्याची जबाबदारी होती त्यामुळे त्यांनी त्याचा फायदा घेत लाखो रुपये काढून घेतले. बँकेतील ग्राहकांना पैसे काढून घेतल्यावर पैसे काढल्याचा एसएमएस जातो हे माहित असल्याने निंबाळकर याने बँकेच्या सिस्टीममधील ग्राहकांचे नोंदणी केलेले मोबाईल क्रमांक बदलून स्वतःचा व इतर नंबर टाकले त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातील पैसे काढले गेले आहेत हे कळले नाही.
बँकेचे खातेदार असलेले सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कदम हे बँकेत पैसे काढायला गेल्यावर त्याच्या खात्यातील तब्बल 12 लाख रुपये नसल्याचे लक्षात आल्यावर हा सगळा प्रकार समोर आला.त्यानंतर चौकशी करण्यात आली त्यात इतर 7 ग्राहकाचे तब्बल 35 लाख खात्यातुन काढल्याचे समोर आले आहे तर 15 खात्यावर डुप्लिकेट सही केली आहे. संधी देऊनही या लिपिकाने अपहरीत रक्कम बँकेत जमा केली नाही. या गंभीर प्रकरणात अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही.
हा सर्व प्रकार बँकेच्या संचालक मंडळाने गांभीर्याने घेतला असून याबाबत संचालक मंडळाची लवकरच विशेष बैठक घेऊन पुढील कारवाईचे स्वरूप त्यात ठरणार असल्याची माहिती आहे.
बँकेत ग्राहकांच्या खात्याचे सर्व डिटेल्स, सहीचे नमुने हे निंबाळकर याला माहित होते त्याचा फायदा घेत घोटाळा घातला. बँकेत रक्कम काढण्यासाठी असलेली पावती जमा केल्यानंतर अनेक स्तरावर त्याचे प्रामाणिकरण होते व त्यानंतर ग्राहकांना पैसे दिले जातात. हे एकट्या व्यक्तीने करणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या घोटाळ्यात निंबाळकर यांच्यासोबत कोणाचा हात आहे का ? याची चौकशी केली जाणार आहे.