धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभा मतमोजणीला अवघ्या काही तासात सुरुवात होणार असुन ईव्हीएम असलेल्या रूमचे सील उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे आणि इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता सुरुवातीला 9 हजार 231 पोस्टल मतांची मोजणी सुरु होईल त्यानंतर ईव्हीएम पेटीतील मते मोजण्यास सुरुवात होईल. सरासरी एका राऊंडला 25-30 मिनीट लागु शकतात. कलम 144 लागु केले असुन पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.
महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात सरळ लढत झाली आहे. वंचितचे भाऊसाहेब आंधळकर हे कोणासाठी तारक मारक ठरतात याकडे लक्ष लागले आहे.
लोकसभेची मतमोजणी 6 विधानसभा मतदार संघात 14 टेबलवर एक राऊंड अशी होणार आहे, एका राऊंडमध्ये 84 मतदान केंद्र मोजली जाणार आहेत. धाराशिव लोकसभेत 2 हजार 139 मतदान केंद्र आहेत.
धाराशिव लोकसभेतील 8 आमदार ( मंत्री तानाजीराव सावंत, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, अभिमन्यू पवार, राजाभाऊ राऊत, शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, स्थानिक स्वराज संस्था आमदार सुरेश अण्णा धस ) व इतर पक्षातून आलेले अनेक स्थानिक नेते, माजी आमदार हे महायुतीच्या बाजूने आहेत तर महाविकास आघाडीकडे धाराशिवचे एकमेव आमदार कैलास पाटील व इतर नेते आहेत. सर्व दिग्गज आमदार विरुद्ध ओमराजे निंबाळकर व महाविकास आघाडी अशी ही रंजक लढत आहे.
2024 ला धाराशिव लोकसभेत 63.88 टक्के मतदान झाले आहे.19 लाख 92 हजार 737 मतदार पैकी 12 लाख 82 हजार 290 मतदान झाले असुन त्यात ईव्हीएमद्वारे 12 लाख 72 हजार 969 तर पोस्टल 9 हजार 231 मतदान झाले आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 2 लाख 45 हजार 627 मतदान झाले त्यापाठोपाठ धाराशिव विधानसभा मतदार संघात 2 लाख 34 हजार 106 मतदान झाले त्यामुळे या 2 मतदार संघाचा कौल महत्वाचा ठरणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 68 हजार 137 इतके मतदान जास्त झाले त्यामुळे तेही महत्वाचे ठरणार आहे.
औसा विधानसभा 22 राऊंड, उमरगा 23, तुळजापूर 29, धाराशिव 30, परंडा 27 व बार्शी येथे 24 मतमोजणीचे राऊंड होणार आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत 18 लाख 86 हजार 238 पैकी 12 लाख 4 हजार 832 इतके 63.87 टक्के मतदान झाले त्यात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 5 लाख 96 हजार 640 व राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना 4 लाख 69 हजार 74 इतके मतदान मिळाले होते, ओमराजे हे 1 लाख 27 हजार 566 मतांनी विजयी झाले होते. ओमराजे निंबाळकर यांना 49.5 टक्के तर राणाजगजीतसिंह पाटील यांना 38.9 टक्के मते मिळाली होती.