मंदीर प्रवेश बंदी – तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांच्यावर 1 महिन्यासाठी कारवाई
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांच्यावर तुळजाभवानी मंदिरात 1 महिने प्रवेश बंदीची कारवाई तुळजाभवानी मंदीर संस्थानने केली आहे. देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात नियमबाह्य प्रवेश केल्याचे प्रकरणी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम-परमेश्वर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती त्यावर 1 महिन्याच्या मंदीर प्रवेशबंदीचे आदेश दिले आहेत. देऊळ ए कवायत अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
विशाल रोचकरी यांनी चुकीच्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केला. पाळीकर, भोपे पुजारी, सेवेदार, महंत,मंदीर कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांना प्रवेश असलेल्या द्वारातून त्यांनी प्रवेश केला तसेच गाभाऱ्यात प्रवेश केला. याबाबतची तक्रार कदम यांनीजिल्हाधिकारी यांच्याकडे केल्यानंतर चौकशीत दोषी सापडल्यावर मंदीर प्रवेश बंदीची कारवाई केली आहे.
मंदीर संस्थानची ही केलेली कारवाई योग्य व स्वागतहार्य आहे, माझ्याकडून जाणीवपूर्वक नियम मोडले गेले नसून नकळत गर्दीत तो प्रकार घडला आहे. सर्वांनी नियम पाळणे गरजेचे आहे, या कारवाई निमित्ताने मंदिरात एक शिस्त लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत कायदा नियम सर्वांसाठी सारखे असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. विरोधकांचा हा डाव असून त्याला योग्य वेळी उत्तर देऊ असे रोचकरी म्हणाले.