अखेर राज्य सरकारची परवानगी, तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश
धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील सोने चांदी अपहार प्रकरणी अखेर राज्य सरकारने गुन्हा नोंद करण्यासाठी परवानगी दिली असुन त्याबाबत सीआयडीने लेखी पत्र देत आदेश काढले आहेत. तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येणार असुन धाराशिवचे तात्कालीन पोलिस अधीक्षक व सध्या छत्रपती संभाजीनगर सीआयडी विभागाचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे या गुन्ह्याचा तपास करणार आहेत.
सोने चांदी घोटाळ्यात अनेक शासकीय अधिकारी, ठेकेदार व स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी असल्याने सीआयडीने गुन्हा नोंद करण्यापुर्वी शासनाची परवानगी मागितली होती, ती परवानगी देत आदेश काढले आहेत. सीआयडीचे अपर पोलिस अधीक्षक सुभाष निकम यांनी फिर्याद देऊन तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करावा व या गुन्ह्याचा तपास सीआयडी संभाजीनगर विभागाचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी करण्याचे आदेश अपर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी दिले आहेत.
1991 ते 2009 या काळातील 39 किलो सोने आणि 608 किलो चांदी असा 7 कोटी 19 लाख रुपयांचा अपहार झाला आहे, यात सीआयडीचे 2 स्वतंत्र चौकशी अहवाल असुन त्यात आरोपीची नावे आहेत त्याप्रमाणे गुन्हा नोंद करावा असे आदेश दिले आहेत. 27 सप्टेंबर 2017 व 21 जानेवारी 2018 या तारखेचे ते अहवाल आहेत. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी यांची तक्रार केल्यानंतर तात्कालीन जिल्हाधिकारी डॉ प्रवीण गेडाम यांनी दखल घेतली होती व धर्मादाय आयुक्त व सीआयडीने याची चौकशी केली होती त्यात अनेक जन सापडले होते.
कलम 420, 467,468,471,406, 409 अंतर्गत गुन्हा नोंद करुन त्याचा तपास सीआयडीच्या पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकारी यांच्याकडे देण्याचे आदेशात नमूद केले आहे. न्यायमूर्ती शैलेश भ्रहमे व मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने सरकारला आदेश दिले आहेत. हिंदू जनजागृती समितीने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत पाठपुरावा केला होता.
धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पवारांनी 1991 साली दानपेट्यांचा लिलाव प्रथम सुरु केला तेव्हापासुन या घोटाळ्यास सुरुवात झाली.पुणे सीआयडीने या सोने चांदी घोटाळा प्रकरणी तत्कालीन 42 अधिकारी कर्मचाऱ्यांवर घोटाळ्याचा आरोप ठेवला आहे यामध्ये 9 उपविभागीय अधिकारी , 9 तहसीलदार , 10 ठेकेदार , 14 मंदिर कर्मचारी यांचा समावेश आहे तर 11 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या खातेअंतर्गत कारवाईची शिफारस करण्यात आली होती. मंदिराचे विश्वस्त असलेले 8 माजी नगराध्यक्ष व तत्कालीन आमदार याच्यावर निष्काळजीपणाचा आरोप सीआयडीने ठेवला आहे.
सन १९९९ ते २००९ या काळातील नोंदीनुसार मंदिर देवस्थानकडे केवळ ५ तोळे सोने व अर्धा किलो ग्रॅम चांदी जमा झाली हे खरच पटत नसल्याने या घटनेनंतर तत्कालीन जिल्हा अधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ प्रवीण गेडाम यांनी तुळजाभवानी मातेचे उत्पन्नाचा आकडा तपासण्यासाठी १९ मार्च २०१० मध्ये १ महिन्यासाठी सील केल्या. या एक महिन्यात तुळजाभवानीच्या दानपेटीत २३ लाख रोख व ४० तोळे सोने व ६ किलो चांदी सापडली होती. लातूर धर्मादाय आयुक्ताकडे तक्रार अर्ज करून या प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्याची विनंती केली, या तक्रारीनंतर एकामागून एक खुलासे होत गेले.
सन १९८४ ते १९९१ या काळात दानपेट्या मंदिर संस्थांकडे होत्या तर १९९१ ते २०१० दरम्यान लिलाव पद्धतीने त्या ठेकेदाराकडे होत्या . ठेकेदाराला देण्यात आलेले ठेके नाममात्र दराचे होते . ठेकेदार व व मंदिर संस्थांनचे अधिकारी यांनी संगनमत करून तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण केले सोने मातेच्या तिजोरीत जमा केलेच नाही .