अध्यादेश जारी – कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या 10 हजार 347 कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता
दुष्काळमुक्तीकडे वाटचाल – पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंतांच्या पाठपुराव्याला यश
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देण्याच्या अनुषंगाने खर्चास सुधारित मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पच्या 10 हजार 347 कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणारा शासन निर्णय जलसंपदा विभागाने जारी केला आहे. या योजनेचा उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना फायदा होणार आहे.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या या निधीमुळे प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली असून दुष्काळमुक्तीकडे वाटचाल होणार आहे. जून 2025 पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी सांगितले.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पची सुप्रमा कार्यवाही 2019 पासून शासनाकडे निर्णयार्थ आहे यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अडचणी येत असल्याचे पत्र मंत्री सावंत यांनी दिले होते त्यानंतर या प्रक्रियेला गती आली. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 133 गावांना याचा फायदा होणार आहे. मंत्री सावंत यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील 133 गावातील 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा व उमरगा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला लाभ होणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी उपसा सिंचन योजना क्रमांक एक व दोन तर बीड जिल्ह्यासाठी आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन उपसा सिंचन योजनेचा समावेश आहे. त्यातील सिंचन योजना क्रमांक एक व दोनमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश आहे.