मटका जुगाराचे दोघे सुत्रधार उस्मानाबाद जिल्ह्यातून 55 दिवस हद्दपार – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची कारवाई
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातून 2 मटका किंग सूत्रधारांना 55 दिवसासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ही कारवाई केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागात काही जण वर्षानुवर्षे मटका, जुगार घेतात त्यांच्यावर जवळपास 25 पेक्षा जास्त केस आहेत अश्यावर पण अशीच कारवाई अपेक्षित आहे.
लोहारा तालुक्यातील माकणी येथील दिलीप विश्वंभर साठे उर्फ उमराव व सतीश लक्ष्मण रजपुत हे दोघे एकत्र येउन उपद्रवि टोळी करुन साथीदारांसह माकणी, सास्तुर, पेठसांगवी, लोहारा, जेवळी, कानेगाव तसेच आजुबाजूच्या गावात कल्याण व मुंबई मटका जुगार बुक्की चालवत होते. त्याचे संयोजनकर्ते व सुत्रधार असून तो जुगार फोफावत असल्याने जुगार व्यसनाच्या आहारी जाउन अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. मटका व्यवसायामुळे त्यांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य जनता कंटाळली असून त्यांना प्रचलीत कायद्याची भिती अगर आदर न राहिल्याने लोहारा पोलीस ठाण्याचे सपोनि चिंतले यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 55 अंतर्गत नमूद दोघांविरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावाची चौकशी उप विभागीय पोलीस अधिकारी उमरगा बरकते यांनी करुन अहवाल सादर केल्याने व समक्ष झालेल्या सुनावणीत पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण, उस्मानाबाद अतुल कुलकर्णी यांनी दिलीप साठे व सतीश रजपुत या दोघांना उस्मानाबाद जिल्ह्यातुन 55 दिवसाकरीता हद्दपार केले आहे. या काळात त्यांना न्यायालयाच्या किंवा सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेशिवाय जिल्ह्यात प्रवेश करता येणार नसून तसे केल्यास त्या आदेशाचा भंग ठरणार आहे.