डॉ पाटील परिवाराला जे जमलं नाही ते मंत्री सावंतांनी बोलुन दाखवलं – राजकीय वातावरण पेटलं
धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर तेरणा ट्रस्ट, तेरणा कारखान्याचे भांगर, जिल्हा मध्यवर्ती बँक यासह पवनराजे हत्याकांड या मुद्यावर थेट हल्ला करीत टीका केली त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तेरणा ट्रस्ट, कारखाना भंगार केला, जिल्हा बँक बुडवली, हे सर्व पवनराजे यांनी केले व त्याचे खापर डॉ पद्मसिंह पाटील यांच्यावर फोडले असा आरोप मंत्री सावंत यांनी केला. ओमराजे नेहमी बाप मारला, बाप मारला असे भावनिक वातावरण निर्माण करतात, मडपीक आपण एकदाच घेतो. मड पीक 15 -15 वर्ष असते का ? म्हातारा झाला तरी मड पीकावरच जगायचं, ही कुठली पद्धत आहे असा आरोप केला. डॉ पाटील परिवाराशी संबंधित आरोप असताना त्यांनी अनेक गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या नाहीत किंबहुना थेट आरोप केले नाही मात्र जे पाटील परिवाराला जमलं नाही ते मंत्री सावंतांनी बोलुन दाखवलं त्यामुळे राजकीय वातावरण आरोप प्रत्यारोप याने चांगलेच पेटलं आहे. सावंतांनी आरोप करुन बोलुन दाखवलं तरी याची उत्तरे पाटील निंबाळकर यांच्याकडून जनतेला अपेक्षित आहेत.
खासदार ड्रामेबाज आहे त्याचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नाही. तेरणा बंद पाडून सगळे भंगार विकले आणि त्याचे खापर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर फोडत सुटला आहे आता या ड्रामेगिरीला कडवट शिवसैनिक फसणार नाही. असे मंत्री तानाजी सावंत ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर शिवसैनिकांचा कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले.मागील निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी बदलली गेली. त्याला 60 टक्के आपण स्वतः आणि 40 टक्के उध्दव ठाकरे स्वतः कारणीभूत होते त्यावेळची चूक आता सुधारून घ्यायला हवी. काळूबाळू अशा शब्दात विरोधी उमेदवार आणि आमदारांचा उल्लेख करीत पालकमंत्री सावंत यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला होता.
स्वतःच्या कारखान्यातील साखर विकून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले. निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्ता काळात भ्रष्टाचार करू नका, असे सांगत होतो. मात्र सत्ता असताना पैसे खायचे नाही. तर मग काय शेण खायचे ? अशा शब्दात हे सांगत होते. यातील एक शब्दही खोटा नाही. खोटे बोलण्याची आपल्याला गरजही नाही, अधिकाऱ्याकडुन पैसे उकळणारांना आता शिवसैनिक योग्य ती जागा दाखवतील असा इशारा दिला.भंगार विकणाऱ्याची औलाद, तुम्ही काय दिवे लावले. सुरुवातीला काँग्रेस नेत्याला राजकीय बाप केले नंतर शिवसेनेत मला बाप केले, अशी टीका केली.
पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. माझा बाप मारला, माझा बाप मारला असं भावनिक वातावरण ओमराजे निर्माण करतील. माझा बाप मारला काय हे ? 2009 ते आजवर 15 वर्ष झाली, मराठी भाषेत सांगायचं झाल तर मडपीक आपण एकदाच घेतो. मड पीक 15 -15 वर्ष असते का ? म्हातारा झाला तरी मड पीकावरच जगायचं, ही कुठली पद्धत आहे. ज्यावेळी भावनेच्या आहरी जाऊन लोकांनी आमदार केले त्याचं जनतेने 2014 ला घरी बसवले.माझा बाप मारला असे म्हणत आहेस त्यात मतदारसंघातील लोकांचे बाप मारणार निघाला आहेस का ? एक रुपयाचा विकास केला नाही किंवा पावती नाही, ना मदत नाही. भंगारविक्या अशी ओळख असलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांना पराभूत करा असे आवाहन केले. भावनेच्या आहरी जाणारा हा मतदार संघ नाही.
2019 ला तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझ्या हातात धागा बांधून मला सांगितले की तानाजीराव धाराशिवचा खासदार तुम्ही निवडून आणायचा आहे. तुम्ही सांगेल तो उमेदवार, तुम्ही बांधलं ते तोरण असे म्हणाले, त्यामुळे आम्ही ओमराजे यांना विकासासाठी व मोदी यांच्यासाठी निवडून आणले. यावेळी त्यांनी ओमराजे यांचा उल्लेख माजी खासदार करीत टीका केली.
कधी तरी चांगले बोला, तुम्ही बोललेले लोकांना काय वाटते ते तरी बघा. माझी विनंती आहे, इतके दिवस तुमचा मान सन्मान व आई बापाचे संस्कार म्हणून शांत होतो. तोंड आम्हाला पण दिले आहे. यापुढे हीन व नीच पातळीने कै पवन राजे निंबाळकर विरोधात ब्र शब्द काढलेले ओमराजे खपवून घेणार नाही. 40 वर्ष मंत्री आमदार असलेले डॉ पद्मसिंह पाटील व राणा पाटील यांना गार केले आहे, तू किस झाडं की पत्ती है असे म्हणत इशारा ओमराजे यांनी दिला आहे.