सुनावणी पूर्ण – बिअरबार व परमिट रूमची 68 प्रकरणे मंजुरीसाठी सादर, 11 प्रकरणे अपात्र तर 14 प्रकरणात त्रुटी
यादी पहा… जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी घेतली live बैठक
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील बिअरबार व परमिट रूमची परवाने व नूतनीकरण यांची सुनावणी आज पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक गणेश बारगजे यांनी अर्जदार, पत्रकार यांच्या उपस्थितीत लाईव्ह बैठक घेतली. चौकशीअंती 68 प्रकरणे मंजुरीसाठी समितीकडे सादर करण्यात आली आहेत. 11 प्रकरणे अपात्र केली आहेत तर 14 प्रकरणात त्रुटी असल्याने समितीसमोर निर्णयासाठी ठेवली आहेत.
68 प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्राथमिक चौकशी केलेला अहवाल प्राप्त असून त्यातील 39 मुद्देबाबत आक्षेप असल्यास 7 दिवसात नागरिकांनी कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी ओम्बासे यांनी केले. ग्रामपंचायत स्तरावर ही यादी लावण्यात येणार आहे, आक्षेप आले नाही तर मान्यता देण्यात येईल असे ते म्हणाले.
राज्य उत्पादन शुल्क विभागात परवाना, नूतनीकरण यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो, प्रक्रियेत पारदर्शकता नसते त्यामुळे ही सुनावणी लाईव्ह घेतली असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. परवाना कामासाठी कुठल्याही कर्मचारी याला पैसे देऊ नका, नियमात असेल तर मंजुरी मिळेल. जर कोणत्याही अधिकारी व कर्मचारी याने त्रास देण्याच्या हेतूने कारवाई केली तर पाठीशी मी उभा राहील असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी बार चालकांना दिले. फक्त नियमानुसार काम करा.
जिल्हाधिकारी कार्यालयातून पैसे मागणी होणार नाही जर कोणी केली तर कळवावे. उत्पादन शुल्क विभागातून काही मागणी केली तर त्यांची विभागीय चौकशी, निलंबन व प्रसंगी गुन्हे नोंद करू असा इशारा ओम्बासे यांनी दिला.बराच वेळेस परवानासाठी मोठी आर्थिक देवाण घेवाण होते, खालच्या स्तरावर जिल्हाधिकारी यांचे नाव सांगून मागणी केली जाते मात्र ते चुकीचे असते त्यामुळे पैसे देऊ नका.
ग्रामीण भागात धाबे यासह अनेक ठिकाणी गावात अवैध दारू विक्री केली जाते त्यासाठी आता पोलिस कारवाई केली जाणार आहे. अवैध विक्री किंवा प्रकार सुरु असतील तर त्याचे फोटो व व्हिडिओ लोकेशनसह पाठवा कारवाई करू असे आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले. पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभाग संयुक्त कारवाई करणार आहे. धाब्यावर पैसे घेऊन चढ्या दराने विक्री केली जाते ते चुकीचे आहे त्यामुळे कारवाई होणार आहे.
वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील उर्मिला संजय साळुंके, पारगाव येथील समाधान मोटे, तुळजापूर तालुक्यातील अमृतवाडी येथील गणेश देवानंद रोचकरी, सीमा देवानंद रोचकरी, भुम तालुक्यातील ईट येथील वृषाली युवराज देशमुख, तुळजापूर तालुक्यातील खंडाळा येथील उमेश रोहिदास कांबळे, परंडा तालुक्यातील चिंचपुर मनीषा काकासाहेब गरड, उस्मानाबाद तालुक्यातील लासोना येथील योगिता कनकधर,उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील दयासागर चव्हाण, नारंगवाडी येथील शुभम कांबळे व हॉटेल सूर्यकिरणचे मुशनम गौड यांचे प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत.
लोहारा तालुक्यातील कोंडजीगड येथील धनराज बिराजदार, निकिता उमाकांत गोरे, प्रथमेश नारायणकर, बेंडकाळ येथील इरफान सय्यद, उमरगा तालुक्यातील मुळज येथील सतीश कांबळे, कोरेगाववाडी अहिल्याबाई पंडीत, वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील बाबासाहेब घोलप, वाशी येथील सिंधू संदीप हुंबे,भुम तालुक्यातील अविनाश डंबरे, गनेगाव येथील पुष्पा उमाकांत जोगदंड, परंडा तालुक्यातील वाकडी येथील अशोक राऊत, उस्मानाबाद येथील रंगनाथ खोचरे, महादेव पवार, येडशी येथील संतोष पवार याच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने ते समितीकडे निर्णयासाठी पाठविले आहेत.