घोटाळ्याच्या चौकशीतच घोटाळा ? बेंबळीचे उपसरपंच इंगळे यांच्या बोगस सह्या, कारवाईची मागणी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद पंचायत समिती अंतर्गत करण्यात आलेल्या शोषखड्डे घोटाळ्याच्या चौकशी अहवालावर आता प्रश्नचीन्ह निर्माण झाले आहे. बेंबळी गावचे उपसरपंच नितीन शिवाजी इंगळे यांनी या अहवालाबाबत गंभीर आरोप केले आहेत, हजेरीपत्रकावर त्यांची सही नसून जो शिक्का मारण्यात आला आहे तो सरपंच यांचा असुन त्यावर पेनाने ‘उप’ असे लिहून उपसरपंच केले आहे शिवाय शिक्क्यावर बेंबळी गावचा उल्लेख नसून यात चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी अशी मागणी इंगळे यांनी केली आहे. या आरोपाने घोटाळ्याच्या चौकशी अहवालतच घोटाळा अशी स्तिथी निर्माण झाली असून गुंता वाढला आहे.
गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार 7 सदस्य असलेल्या पडताळणी पथकाने चौकशी करुन एक संयुक्त अहवाल दिला होता. त्यात सहायक कार्यक्रम अधिकारी व्ही आर कोळी, शाखा अभियंता डी एन सूर्यवंशी व एन एस पाटील, कृषी अधिकारी एस जे दराडे, विस्तार अधिकारी डी टी साळुंके, बी एच देशमुख आणि एस ए भांगे यांचा समावेश आहे.
पडताळणी पथक अहवालनुसार बेंबळी येथील सरपंचांना क्लीन चिट देण्यात आली आहे. बेंबळी गावचे विद्यमान उपसरपंच नितीन शिवाजी इंगळे हे यात दोषी ठरविले आहे. मस्टरवर त्यांच्या सह्या असल्याचे सांगत ते यात सहभागी असल्याचा ठपका ठेवला आहे. इंगळे यांना ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 अन्वये अपात्रतेची कारवाई का करण्यात येऊ नये ? याबाबत नोटीस देण्यात आली आहे. इंगळे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत त्याबाबत कोर्टात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.
इंगळे यांनी 109 मस्टरच्या नकला घेल्या असून त्यावर त्यांची सही नसून इतर कोणाची सही असल्याचे ते म्हणाले. ग्रामपंचायत प्रोसिडींग रेकॉर्ड, त्यांची डिजिटल कागदपत्रेवरील सही व मस्टरवरील सही यात तफावत आहे, पडताळणी पथकाने त्यांना चौकशीसाठी बोलावले नाही किंवा नोटीस दिली नाही. दोन्ही सही न पाहता अहवाल दिल्याचा आरोप इंगळे यांनी केला आहे. दरम्यान याची पडताळणी करू त्यानंतर सांगता येईल असे गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने यांनी सांगितले.
बेंबळी येथील प्रकरणात तत्कालीन ग्रामविकास अधिकारी ए व्ही आगळे, पालक तांत्रिक अधिकारी श्रीमती एस आर कांबळे, विद्यमान उपसरपंच नितीन शिवाजी इंगळे, रोजगार सेवक सूर्यकांत अंबादास माने यांना दोषी ठरविले आहे.