शोषखड्डे घोटाळ्याचे मास्टर माईंड सुरेश तायडे अखेर निलंबित – विभागीय आयुक्ताचे आदेश
अनेक कागदपत्रे गायब – भ्रष्टाचाराच्या तायडे पॅटर्नमध्ये 8 जणांवर कारवाई
उस्मानाबाद – समय सारथी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ग्रामपंचायती मार्फत करण्यात आलेल्या सार्वजनिक शोषखड्डेच्या 1 कोटी 12 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात तत्कालीन गट विकास अधिकारी सुरेश तायडे यांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी निलंबित केले आहे. तायडे यांच्या विभागीय चौकशीसाठीचा प्रस्ताव पुराव्याच्या कागदपत्रासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या मार्फत तात्काळ पाठवावा असे आदेशीत केले आहे.
शोषखड्डे घोटाळ्याचे जनक व मास्टर माईंड असलेले सुरेश तायडे यांचे अखेर निलंबन झाले आहे. या घोटाळ्यात 8 जणावर कारवाई झाली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने तायडे यांच्यासह घोटाळ्यातील ग्रामसेवकांवर सेवा समाप्तीची कारवाई करावी अशी मागणी होत आहेत.
मग्रारोहयो अंतर्गत खेड,बेंबळी,मेडसिंगा, ढोकी व उपळा येथे शोषखड्डे करण्याचे काम होते यात 1 कोटी 12 लाख 28 हजार रुपयांचा अपहार झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिला होता. तसेच तत्कालीन गट विकास अधिकारी याच्यावर गैरव्यवहारबाबत निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित करुन त्यांचेवर शिस्तभंग विषयक कार्यवाहीची शिफारस केली होती त्यानुसार निलंबन करुन त्यांना तुळजापूर पंचायत समिती येथे संलग्न करण्यात आले आहे.
उस्मानाबाद पंचायत समितीचे तांत्रिक सहायक राकेश पांडुरंग सगर व स्वाती रोहिदास कांबळे यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत तर ग्रामसेवक ए व्ही आगळे व एस बी सुर्वे यांना दोषी ठरवत कारणे दाखवा नोटीस बजावली असून ग्रामरोजगार सेवक रितापुरे, शित्रे व माने यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.
जानराव यांनी दिलेला अहवाल गायब ?
शोषखड्डे योजनेत घोटाळा होत असल्याची कुणकुण लागताच पंचायत समितीचे रोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी नितेश जानराव यांनी 24 मार्च 2022 महिन्यात गटविकास अधिकारी यांना लेखी कळविले होते मात्र त्याकडे भ्रष्ट अधिकारी यांनी हेतूत दुर्लक्ष करण्यात आले. या बाबतीत रोहयो उप जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांना विचारले असता जानराव यांचे असे कुठलेही पत्र या कार्यालयाकडे आलेले नाही, असे स्पष्टीकरण कांबळे यांनी दिले त्यामुळे हा अहवाल कुठे गायब झाला की केला हे गुलदस्त्यात आहे. घोटाळ्यात हा अहवाल एक मोठा प्राथमिक पुरावा आहे.