जमिनीचा अनधिकृत वापर – रामचंद्र बांगड यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे मुख्याधिकारी यांचे आदेश
मोक्याची जागा हडप करण्याचा घाट – जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज
धाराशिव – समय सारथी
जमिनीचा अनधिकृत वापर बंद करण्याची नोटीस देऊनही विकास काम बंद न केल्याने रामचंद्र दगडूलाल बांगड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी दिले आहेत. स्वच्छता विभागाचे लिपीक गोरख रणखांब यांना प्राधिकृत केले असुन आठवडा झाला तरी गुन्हा नोंद करण्यात आला नाही.
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ प्रवीण गेडाम यांनी या जागेचे प्रकरण बाहेर काढत भुमाफियाचा भांडाफोड केला होता. त्यावेळी ही जागा शासकीय असल्याचे समोर आले मात्र त्यानंतर महसूलच्या अधिकारी यांनी यात ओले केले. शहरातील मुख्य रस्त्यावर जनता बँकेच्या समोर मोक्याच्या ठिकाणी ही जागा असुन ती हडप करण्याचा घाट रचला गेला असुन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी यात लक्ष देण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 53 व 54 नुसार बांगड यांना अनधिकृत वापर 24 तासात बंद करावा अश्या 2 वेळेस नोटीसा दिल्या होत्या मात्र नगर परिषदेतील सर्व्हे नंबर 240 मध्ये त्यांनी काम सुरु ठेवले. अनधिकृत विकास काढून घेतला नसल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.