धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेसाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचा उमेदवार अंतीम झाला नसुन जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात उद्या सकाळी 11 वाजता अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांचा पक्षप्रवेश आहे. मुंबई येथे पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार असुन त्यानंतर त्यांच्या नावाची लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषणा होऊ शकते.
पक्षवाढीसाठी एखादा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करेल व त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असे सुचक विधान राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याकडुन केले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे परभणी येथे महादेव जानकर यांची उमेदवारी अर्ज भरण्यास गेले होते त्यानंतर एक दोन दिवस चर्चा व इतर कारणामुळे पक्ष प्रवेश रखडला होता. उद्या सकाळी पक्षप्रवेश व उमेदवारी घोषणा होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे.
धाराशिवच्या लोकसभेच्या इतिहासात 1991 साली विमल मुंदडा, 2004 साली माजी खासदार कल्पना नरहिरे नंतर तिसऱ्यांदा 2024 मध्ये अर्चना पाटील यांच्या रूपाने महिला उमेदवाराला संधी मिळणार आहे. कल्पना नरहिरे यांचा 1,649 मतांनी विजय झाला होता तर मुंदडा ह्या 83,055 मतांनी पराभूत झाल्या.
सौ अर्चना राणाजगजीतसिंह पाटील ह्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी तथा धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत. लेडीज क्लब या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा असुन धाराशिव जिल्ह्यात मोठे महिला संघटन, दांडिया महोत्सव, नवरात्र यासह अन्य महिलांचे कार्यक्रम आयोजन केले आहे.
धाराशिव लोकसभेत 20 लाख 8 हजार 92 इतके मतदार असुन त्यात 9 लाख 46 हजार 54 मतदार ह्या महिला असुन 10 लाख 58 हजार पुरुष मतदार आहेत. महिला उमेदवार आल्यास महिला मतदारांचे मत निर्णायक ठरू शकते.
धाराशिव जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार असुन 12 एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल तर 19 एप्रिल अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असेल. 20 एप्रिल रोजी अर्जाची छानणी तर 22 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 7 मे ला मतदान असुन मतमोजणी 4 जुन रोजी असणार आहे.