मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजना – अनेक तक्रारी, चौकशीची मागणी
मोजमाप पुस्तिकेत कामाचे मूल्यांकन न करता लाखोंची बिले
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद पंचायत समितीमध्ये शोषखड्डे घोटाळा बाहेर आल्यानंतर खळबळ उडाली असतानाच शेवगा लागवड योजनेतील अपहाराच्या तक्रारीनंतर चौकशी समिती नेमण्यात आली त्यानंतर आता मातोश्री ग्रामसमृद्धी शेत व पाणंद रस्ते योजना आरोपांच्या भोवऱ्यात अडकली आहे. मोजमाप पुस्तिकेत कामांचे मूल्यांकन न करता लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याची माहिती आहे. या योजनेत गैरकारभाराचे अनेक तक्रारी,धक्कादायक खुलासे समोर आले असुन लवकरच घोटाळ्याची पोलखोल होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी या योजनेच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व कामांची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात मातोश्री शेतरस्त्याची 598 कामे असून त्यातील 340 कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे तर 302 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 299 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून 184 कामे प्रत्यक्षात सुरु आहेत. कळंब तालुक्यात सर्वाधिक 89 तर उस्मानाबाद तालुक्यात 40, उमरगा 25 कामे सुरु आहेत. ही कामे ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम यांच्या मार्फत आहेत.598 पैकी 184 कामे सुरु असून 414 कामे सुरु होणे बाकी आहे त्यामुळे वेळीच गैरकारभारावर आळा घालणे सोपे होणार आहे.
मातोश्री योजनेत उस्मानाबाद पंचायत समिती अंतर्गत सर्वाधिक 37 कामे करण्यात आली असून यातील अनेक कामाबाबत मोठ्या तक्रारी आहेत. मोजमाप पुस्तिकेत कामांचे मूल्यांकन न करता लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहेत तर बोगस मस्टर, एम बी यासह झालेल्या प्रत्यक्ष कामापेक्षा अधिक रक्कम अदा करण्यात आली असल्याची माहिती आहे. थोडक्यात शोषखड्डे घोटाळ्याचा पॅटर्न इथे पण तंतोतंत राबविला आहे.
शेतीला बारामाही रस्त्याची आवश्यकता असल्याने ही योजना सुरु करण्यात आली. विविध कामे करताना कुशल व अकुशल कामे करताना खर्चाचे 60:40 हे प्रमाण राखण्यात आले आहे मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही. कामाच्या ठिकाणी जिओ टॅगिंग करणे, काम सुरु करण्यापूर्वी, काम सुरु असताना व काम पुर्ण झाल्यावर फोटो काढणे बंधनकारक केले आहे. अकुशल मजुरीचे प्रदान हजेरी पत्रकाप्रमाणे थेट मजुराच्या खात्यावर जमा करण्याचे आदेशीत आहेत मात्र तसे झालेले नसून एकाच खात्यावर लाखोंची रक्कम टाकण्यात आली आहे. अपहार सापडल्यावर मात्र जास्त अदाईचे गोंडस कारण पुढे केले जात असल्याचे दिसते.
मातोश्रीत एमबी क्लिअर करा, शोषखड्ड्यात क्लीनचिट घ्या
भ्रष्टाचार करणाऱ्या पंचायत समितीतील काही अधिकारी यांची मातोश्री पाणंद रस्त्यात सुद्धा वाट हरविली आहे. शोषखड्डे पेक्षा हा घोटाळा मोठा असून मातोश्रीने शोष खड्ड्यावर मात केली असेच काहीसे असल्याची चर्चा आहे. मातोश्री योजनेतील कागदपत्रे क्लिअर करा व शोषखड्डे घोटाळा प्रकरणात क्लीनचिट घ्या अशीच काहीशी योजना राबविल्याचे कळते.