अरविंद कांबळे 4 वेळेस, तुळशीराम पाटील 3 वेळेस तर शिवाजी कांबळे 2 वेळेस खासदार
रेकॉर्ड – 2014 च्या निवडणुक 27 उमेदवार – 1999 साली 71.24 टक्के मतदान
कल्पना नरहिरे सर्वात कमी 1,649 तर रविंद्र गायकवाड सर्वाधिक 2,34,325 मतांनी विजयी
धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव असे झाले असले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र मतदारसंघाचे नाव हे उस्मानाबाद असेच असणार आहे. उस्मानाबाद लोकसभा निवडणूक चुरशीची होणार असून, महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा थेट सामना रंगणार आहे. महायुतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे तर महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांचे नाव जवळपास निश्चित आहे.
1951 ते 2019 या दरम्यान 17 वेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. या काळात भाराकाँने तब्बल 11 वेळेस तर शिवसेनेने 5 वेळेस विजय मिळविला तर डॉ. पद्मसिंह पाटील यांचे रुपाने राष्ट्रवादीला 1 वेळेस विजय मिळविता आहे. अरविंद कांबळे हे सर्वाधिक 4 वेळेस खासदार राहिले तर तुळशीराम पाटील हे सलग 3 वेळेस विजयी होऊन हॅट्रीक केली तर शिवसेनेचे शिवाजी कांबळे 2 वेळेस खासदार राहिले. आजवर उस्मानाबादमध्ये 11 खासदार झाले त्यातील तुकाराम श्रृंंगारे हे 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात पंतप्रधान चरणसिंग यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय संचारमंत्री होते.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते तर 1999 साली सर्वाधिक 71.24 टक्के इतके मतदान झाले. शिवसेनेच्या कल्पना नरहिरे या 2004 साली सर्वात कमी 1 हजार 649 इतक्या मताने विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून लक्ष्मण ढोबळे हे निवडणुकीच्या रिंगणात हेाते तर 2014 साली शिवसेनेचे रविंद्र गायकवाड हे सर्वाधिक 2 लाख 34 हजार 325 इतक्या विक्रमी मतांनी विजयी झाले. सर्वाधिक फरकाने निवडून येण्याचे विक्रम त्यांचे नावे आहे. 2014 गायकवाड यांच्या विरोधात राश्ट्रवादीकडून माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात हेाते त्यावेळी रोहन सुभाष देशमुख हे अपक्ष म्हणून उभे राहिले तर पद्मसिंह विजयसिंह मुंडे पाटील व रविंद्र विश्वनाथ गायकवाड हे सारखी नावे असलेले उमेदवार उभे करण्याची खेळीसुध्दा करण्यात आली. मात्र त्यावेळी ती अपयशी ठरली.
ओमराजे यांना औसा मतदारसंघाने तारले
2019 च्या लढतीत शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना औसा मतदारसंघाने तारले. ओमराजे विरुध्द त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले राणाजगजितसिंह यांच्यात लढत झाली. यात ओमराजे यांना सर्व सहा मतदारसंघात आघाडी मिळाली. त्यात सर्वाधिक आघाडी औसा येथे 53 हजार 504 मते मिळाली. ओमराजे हे 1 लाख 27 हजार 566 (10.06 टक्के) अधिक मते घेऊन विजयी झाले.
शिवसेनेचा विजयी प्रवास
1989 साली शिवसेनेने पहिल्यांदा यशवंत मारुती पेठे यांना उमेदवारी दिली त्यावेळी त्यांना 78,414 मते मिळाली त्यानंतर 1996 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा उस्मानाबाद लोकसभेवर विजय मिळविता आला. शिवाजी विठ्ठल कांबळे यांनी अरविंद कांबळे यांचा 15 हजार 919 मतांनी पराभव केला. शिवसेनेने आजवर 5 वेळेस विजय मिळविला असून, कल्पना नरहिरे, रविंद्र गायकवाड, ओम राजेनिंबाळकर हे सेनेचे खासदार राहिले.