Impact – उस्मानाबाद पंचायत समितीच्या विशेष लेखापरीक्षणाचे जिल्हाधिकारी ओम्बासे यांचे आदेश
झिरो मस्टरचा हिरो कोण ? 5 सदस्यीय समिती गठीत, सर्व योजनांची होणार चौकशी – रोहयो योजना फेऱ्यात
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद पंचायत समितीच्या शोषखड्डे, शेवगा लागवड, मातोश्री पाणंद व घरकुल योजनेतील घोटाळा दैनिक समय सारथीने पुराव्यासह उघड केल्यानंतर या घोटाळ्याची दखल उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी घेतली असून पंचायत समितीच्या सर्व योजनाचे विशेष लेखापरीक्षक करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्य असलेली चौकशी समिती गठीत करण्यात आली असून इतर तालुक्याचे गटविकास अधिकारी यांची नेमणूक करुन उपसमितीमार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी होणार आहे.
चौकशी करुन समितीने स्वयंस्पष्ट अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेशीत केले आहे. रोहयो उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी याबाबत लेखी आदेश काढले आहेत. एकामागुन एक उघड झालेल्या घोटाळ्यामुळे मग्रारोहयो योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकली असून यात किती जणांचा सहभाग आहे हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे. उस्मानाबाद पंचायत समितीसारखाच प्रकार कळंब,तुळजापूर, भुमसह अन्य पंचायत समितीमध्ये त्यामुळे त्यांचीही चौकशीची मागणी होत आहे.
शेवगा लागवड, शोषखड्डे, घरकुल, सिंचन विहीर, मातोश्री पानंद शेतरस्ते, वृक्षलागवड, विहीर पुनर्भरण या कामांची 1 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या काळातील कामांची चौकशी होणार आहे. या चौकशी समितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव हे अध्यक्ष राहणार असून जिल्हा परिषदेच्या नरेगा सेलचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब चकोर, रोहयोचे सहायक लेखाधिकारी डी डी हेडगिरे, श्रीमती चेडे व जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो कार्यक्रम व्यवस्थापक विशाल आवाड यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
शेवगा लागवड प्रकरणात उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी सुरु आहे. शोषखड्डे घोटाळ्यात 10 जणांची विकेट पडली आहे. मजुरांच्या काम मागणीचे मस्टर झिरो करण्यामागचा हिरो कोण हे स्पष्ट होणार आहे.
पंचायत समितीच्या विशेष चौकशीचे आदेश
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी घेतली असून पंचायत समितीच्या सर्व योजनाचे विशेष लेखापरीक्षक करण्याचे आदेश दिले आहेत. शेवगा लागवड, शोषखड्डे, घरकुल, सिंचन विहीर, मातोश्री पानंद शेतरस्ते, वृक्ष लागवड, विहीर पुनर्भरण या कामांची 1 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या काळातील कामांची चौकशी होणार आहे. या चौकशी समितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव हे अध्यक्ष आहेत तर शेवगा लागवड प्रकरणात उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी सुरु आहे, यात प्रत्यक्ष स्थळपाहणी केल्यावर अनेक धक्कादायक बाबी समोर येणार आहेत