सावकारी जाचाला कंटाळून नारंगवाडी येथे शेतकऱ्याची आत्महत्या
7 सावकारावर गुन्हा नोंद – अनेक तक्रारी, प्रशासन दखल घेणार का ?
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात खासगी सावकारकी वाढली असून सावकारी जाचाला कंटाळून उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कर्जाची व्याजासह परतफेड करूनही शेत नावावर करुन देण्यास टाळाटाळ करीत जाच दिल्याने शेतकरी दिगंबर लोहार यांनी कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेनंतर तक्रारीवरून पोलिसांनी सावकार दामपत्यासह किसन मुगळे याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे पोलिस या सावकारांना पकडून त्यांच्या मुसक्या अवळणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील शेतकरी दिगंबर माधव लोहार यांनी स्वतःची शेतजमीन 1 लाख रुपये कर्ज देऊन सावकाराला खरेदीखत करून दिली होती. आईच्या उपचारासाठी 1 ऑगस्ट 2001 रोजी लोहार यांनी गावातील सावकार दिनकर फत्तेपूरे व त्यांची पत्नी शालिनी यांच्याकडून 1 लाख रुपये दामदुप्पट देण्याच्या अटीवर घेत स्वतःची 3 एकर शेतजमीन खरेदीखत करुन दिली होती, पैसे व्याजासह देऊनही फत्तेपुरे यांनी जमीन परत देण्यास टाळाटाळ केली. लोहार यांनी याबाबत उमरगा येथील सहायक निबंधक यांच्यासह पोलिसात वारंवार तक्रार दिली होती मात्र सावकारावर ठोस कारवाई न झाल्याने अखेर लोहार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून सावकार पती पत्नी असलेल्या दिनकर फत्तेपुरे व शालिनी फत्तेपुरे यांच्यासह किसन गोविंद मुगळे, दयानंद पाटील, गजानंद पाटील, गुंडेराव पाटील यांच्यावर उमरगा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. सावकार अद्याप फरार आहेत. सावकार मुगळे यांच्या विरोधात शेती बळकावल्याच्या अनेक तक्रारी असून त्याच्यावर उमरगा पोलिसांकडून अद्याप ठोस कारवाई केली जात नाही. मुगळे यांनी व्याजाने पैसे घेऊन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत त्याच्या तक्रारी प्रलंबित आहेत.
बाबळसूर येथील शेतकरी बालाजी सूर्यवंशी हे सावकार मुगळे विरोधात त्यांची सावकारीत दिलेली शेतजामीन परत मिळवण्यासाठी 2012 पासून लढा देत आहेत. पैसे परत देऊनही सावकार मुगळे यांचा वेगवेगळ्या पद्धतीने सूर्यवंशी कुटुंबाला मारहाण व इतर जाच सुरूच आहे. सावकार मुगळे यांनी अनेक शेतकऱ्यांची जामीन खरेदी विक्री केली असून त्याच्या विरोधात या भागात अनेक तक्रारी आहेत. सावकार मुगळे यांनी अनेक शेतकऱ्यांची जामीन खरेदी विक्री केली असून त्याच्या विरोधात या भागात अनेक तक्रारी आहेत.
सावकारी वाढली – जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे व पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील वाढती सावकारकी व त्यांच्या जाचाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. एकीकडे शेतकरी अस्मानी संकटाने आर्थिक अडचणीत आलेला असताना दुसरीकडे सावकार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक केली जात आहे. सावकारी जाच हे एक शेतकरी आत्महत्यामागे एक मोठे कारण आहे, शेतकरी यांच्याकडून दामदुप्पट, दर महिन्याला 10 ते 15 टक्के व्याज घेऊन पिळवणूक केली जात आहे. सावकाराच्या तावडीत अडकलेल्या जमिनी व त्याच्या जाचापासून मुक्तता करण्यासाठी प्रशासनाने मोहीम उघडावी अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात अवैध सावकारांचे प्रमाण वाढले आहे.
तक्रारी करा, खचू नका – उपनिबंधक कार्यालयात मिळू शकतो न्याय
खासगी सावकारकी तक्रारीत जमिनीचा प्रत्यक्ष ताबा महत्वाचा असतो. शेतकऱ्यांना अनेक वेळा पैशांची गरज असल्याने ते खासगी सावकार यांच्याकडून व्याजाने पैसे घेतात त्याबद्दल्यात स्वतःची जमीन गहाणखत किंवा कायम खरेदी खत करून देतात. अनेक वेळा सावकार हा जमिनीची कागदोपत्री खरेदी करतो व मालक बनतो मात्र जमिनीचा प्रत्यक्ष ताबा हा शेतकऱ्याकडे असतो, तो शेतकरी ही जमीन कसत असतो. सावकारकीच्या तक्रारी प्रकरणात जमिनीचा ताबा कोणाकडे आहे ? कोण जमीन कसतो यासह शेजारील शेतकरी यांचे जबाब व प्रत्यक्ष घटनास्थळ पंचनामा हा महत्वाचा ठरतो. जिल्हा उपनिबंधक व तालुका निबंधक यांच्याकडे तक्रार करता येते व तिथे सुनावणी होऊन न्याय मिळतो