धाराशिव – समय सारथी
एकीकडे सर्व राजकीय पक्षानी निवडणुकीची तयारी सूरू केलेली असताना धाराशिवमध्ये मराठा समाजाने सुद्धा लोकसभा निवडणुकीची तयारी करीत बैठका सुरु केल्या आहेत. मराठा समाज स्वतंत्र अपक्ष उमेदवार देणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या धाराशिव जिल्ह्यातील भुम येथील मराठा संवाद बैठकीनंतर जिल्ह्यात मराठा समाजाने बैठकांचे सत्र सुरु केले असुन आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून एक उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव या गावात बैठक घेऊन 3 उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी उभे करण्याचा निर्णय घेतला असुन त्यासाठी उमेदवार खर्च हा लोकवर्गणीतुन केला जाणार आहे. आज मोर्डा येथे मराठा समाजाची बैठक होत असुन अनेक ठिकाणी गावोगावी अश्या बैठका व ठराव घेतले जात असुन निवडणुकीचे नियोजन सुरु आहे.
धाराशिव जिल्ह्यात 736 गावे असुन बार्शी व औसा या तालुक्यातील जवळपास 150 पेक्षा जास्त गावे आहेत त्यामुळे 1 हजार उमेदवार उभे केले जाणार आहेत.
384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुक घ्यावी लागते. एका मतदार संघात 24 मशीन उपलब्ध होऊ शकतात त्यात एका ईव्हीएम मशीनमध्ये 16 उमेदवार असे 384 उमेदवार बसू शकतात त्यानंतर अधिक उमेदवार झाल्यास मतपत्रिकेवर मतदान घ्यावे लागते.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आक्रमक आहे. मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाची मागणी असुन समाज आक्रमक असुन हे नवीन आंदोलन सुरु केले आहे.