धाराशिव – समय सारथी
27 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना दिलासा मिळाला असुन त्यांचा जामीन अर्ज छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने मंजुर केला असल्याची माहिती ऍड विशाल साखरे यांनी दिली. कोर्टाने या प्रकरणात जामीन मंजुर केल्याने तब्बल 7 महिन्यानंतर यलगट्टे यांचा धाराशिव जेलमधुन बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, इतर प्रकरणात सुद्धा त्यांना पुर्वी जामीन मिळाला आहे. यलगट्टे यांना पुणे येथून अटक केल्यानंतर ऑगस्ट 23 पासुन ते वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकले व ते धाराशिव जेलमध्ये आहेत.
विविध विकास योजना व इतर खर्चाची 27 कोटी 34 लाख रुपयांची 514 प्रमाणके म्हणजे व्हाऊचर गहाळ करुन अपहार केल्याचा आरोप यलगट्टे यांच्यावर आहे, या प्रकरणात पोलिसांनी तपास केला.6 जुलै 2020 ते 21 नोव्हेंबर 2022 या 28 महिन्यात 27 कोटी 34 लाख रुपयांच्या विकास कामाच्या बिलात अपहार झाला असुन तो दडवण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी व इतरांनी संगनमत केल्याची तक्रार नगर परिषदेने दिल्यानंतर कलम 420,409,201, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपहार, फसवणूक, पुरावा नष्ट करणेसह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 चे कलम 9 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी नगर परिषदेतील तक्रारी अनुषंगाने चौकशीची मागणी केली होती याबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर चौकशी अंती गुन्हे नोंद करण्यात आले होते. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने नगर परिषदेतील या अपहाराचा पाठपुरावा केला आहे.
निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांचे पदावनत (डिमोशन) करण्यात आले असुन त्यांना मुख्याधिकारी गट अ संवर्गातून मुख्याधिकारी गट ब संवर्गात पदावनत करण्यात आले आहे. विधी व न्याय विभागाच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली शिवाय त्यांच्यावर अनेक गुन्हे धाराशिव येथे नोंद झाले अखेर त्यांची आता जेलमधून सुटका होणार आहे.