निलंबनाचा दणका – घोटाळ्यात सहभागी 2 ग्रामसेवक निलंबित, दैनिक समय सारथी बातमीनंतर कारवाई
3 कर्मचाऱ्यांची कायमची सेवा समाप्ती, काळ्या यादीत समावेश – शोषखड्डे घोटाळा अधिवेशनात गाजणार
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद पंचायत समितीमधील शोषखड्डे घोटाळ्याची पोलखोल दैनिक समय सारथीने पुराव्यासह केल्यानंतर खळबळ उडाली असून या घोटाळ्यातील सहभागी ग्रामसेवक आगळे व सुर्वे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी निलंबित केले आहे तर 3 कंत्राटी कर्मचारी यांना सुनावणीनंतर कायम स्वरूपी सेवेतून निलंबन करुन त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. शोषखड्डे घोटाळ्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार असून पंचायत समितीच्या सर्व कारभाराची विशेष चौकशीची गरज आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बेंबळी येथे शोषखड्डे घोटाळ्यात सहभागी असलेचे आरोपावरून ग्रामसेवक ए व्ही आगळे यांना तर मेडसिंगा येथील ग्रामसेवक एस बी सुर्वे यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश सीईओ गुप्ता यांनी दिले आहेत. निलंबन कालावधीत आगळे यांना तुळजापूर पंचायत समिती तर सुर्वे यांना कळंब पंचायत समिती येथे सल्लग्न करण्यात आले आहे.
उस्मानाबाद पंचायत समिती येथील तांत्रिक सहायक स्वाती रोहिदास कांबळे, राकेश पांडुरंग सगर व सचिन रामहरी वीर या तिघांची सेवा कायमस्वरूपी संपवण्यात आली असून त्यांचे नाव काळ्या यादीत टाकण्याचे आदेश रोहयो उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार श्रीरंगराव कांबळे यांनी सुनावणी अंती दिले आहेत. या तिघांची सेवा यापूर्वी समाप्त करुन कारणे दाखवा नोटीस बजावली होती त्यानंतर त्यांनी खुलासे सादर करीत सुनावणी घेतली व त्यात अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत.
सहायक तांत्रिक अधिकारी आर पी सगर याच्या लेखी जबाबात अनेक धक्कादायक खुलासे आले आहेत. शोषखड्डे सारखा प्रकार घरकुल, मातोश्री पानंद शेतरस्ते कामात झाला असून हजेरी पत्रकावर दाखवलेल्या मजुरांच्या खात्यावर पैसे न जाता काही मोजक्या खात्यावर हे पैसे गेले असून 15 च्या आसपास खाती सापडली असून यांचे बीड कनेक्शन सांगितले जात आहे. सहायक कार्यक्रम अधिकारी जानराव याने घरकुल घोटाळ्यातील बँक खात्यांची माहिती बाहेर कुठे दिलास तर तुला बघून घेईल अशी धमकी दिल्याचे सगर यांनी लेखी नमूद केले आहे.
घरकुलात मोठ्या प्रमाणावर हजेरीपत्रक निर्गमित झाले असून बोगस मजुरांच्या नावावर अकुशल भागाची बिले देण्यात आली आहेत. ही मजुरी काही विशिष्ट खात्यावर वर्ग करण्यात आली असून यात तत्कालीन सहायक कार्यक्रम अधिकारी व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचा हातभार असल्याचा जबाब सगर यांनी चौकशीत दिला आहे. शेवगा घोटाळ्याचा ‘स्वामी’ कोण यनिमित्ताने चर्चा होत आहे. झिरो मस्टरचा हिरो कोण ? हे स्पष्ट होणार आहे.
पंचायत समितीच्या विशेष चौकशीचे आदेश
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी घेतली असून पंचायत समितीच्या सर्व योजनाचे विशेष लेखापरीक्षक करण्याचे आदेश दिले आहेत. शेवगा लागवड, शोषखड्डे, घरकुल, सिंचन विहीर, मातोश्री पानंद शेतरस्ते, वृक्ष लागवड, विहीर पुनर्भरण या कामांची 1 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या काळातील कामांची चौकशी होणार आहे. या चौकशी समितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव हे अध्यक्ष आहेत तर शेवगा लागवड प्रकरणात उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी सुरु आहे, यात प्रत्यक्ष स्थळपाहणी केल्यावर अनेक धक्कादायक बाबी समोर येणार आहेत