गुन्हा नोंद – पंचायत समिती घरकुल घोटाळ्यात एकावर गुन्हा नोंद
घोटाळ्याचे बीड कनेक्शन उघड – जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांच्या आदेशानंतर कारवाई
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद पंचायत समिती येथील घरकुल घोटाळ्यात तांत्रिक सहायक विश्वनाथ ज्ञानेश्वर राऊत याच्यावर आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तब्बल 12 गावात बोगस मजुरांची नावे नोंद करीत लाखो रुपयांची रक्कम बीड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व इतर बँकेतील खात्यावर वर्ग करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली आहे. घरकुल घोटाळ्याचे बीड कनेक्शन यनिमित्ताने उघड झाले असुन यात सरकारी अधिकारी यांच्यासह खासगी दलाल, बँक अधिकारी असे अनेक जण अडकले आहेत. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने हा घोटाळा पुराव्यासह उघड केला होता त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी या घोटाळ्याची दखल घेत तात्काळ गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्या नंतर गट विकास अधिकारी नंदकुमार शेरखाने यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या घरकुल योजनेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा असून यात बोगस मजुरांची नोंद करीत शासकीय निधीचा अपहार करण्यात आला आहे. उस्मानाबाद येथील रोजगार हमी योजना कार्यालयात कंत्राटी सहायक कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करणाऱ्या विजय रामचंद्र कोळी यांनी 18 नोव्हेंबर रोजी रोहयो उपजिल्हाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार दिली होती त्यानंतर या घोटाळ्याची पोलखोल झाली. रामवाडी येथील एका घरकुल लाभार्थीच्या कामावर विजय कोळी व त्यांची आई, भाऊ यांच्या नावावर मस्टर नोंदणी करीत त्यांना मजूर दाखवून पैसे दुसऱ्याच बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी येथील खात्यावर उचलण्यात आले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील रुई ढोकी येथे 39 बोगस मजूर दाखवून तर रामवाडी येथे 38, काजळा येथे 47, गावसूद येथे 6, नांदुर्गा येथे 19, जवळा येथे 16, इर्ला येथे 16, हिंगळजवाडी येथे 27 बोगस मजूर दाखवून पैसे बीड येथील बँकेत वर्ग करण्यात आले आहेत तर घुगी येथे 39 बोगस मजूर दाखवून महाराष्ट्र ग्रामीण बँक जळकोट येथील शाखेत पैसे वर्ग केले आहेत. तांत्रिक सहायक राऊत याच्या विरोधात बोगस मजूर दाखवून पैसे बीड व उस्मानाबाद येथील काही खात्यात वर्ग करुन अपहार केल्याचा गुन्हा कलम भादवी 420, 465,467,468,470,471, 477 अ प्रमाणे नोंद केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांनी दिली. याचा तपास पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सुनील सोनटक्के करीत आहेत.
घरकुल घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून यात बोगस मजूर, एकच बँक खाते अनेक मजुरांच्या नावावर नोंद करणे व त्याला मंजुरी देत पैसे वर्ग करणे, खासगी व्यक्तींच्या बीड येथील खात्यावर पैसे एकत्रित जमा करणे, नागपूर येथील कार्यालय मधील काही जण सहभागी असून यांचे उस्मानाबाद, बीड मार्गे नागपूर कनेक्शन आहे. घरकुल सारखाच घोटाळा शेवगा लागवड, शोषखड्डे, मातोश्री पाणंद शेतरस्ते योजनेत असून त्याची चौकशी 5 सदस्य असलेली समिती करीत आहे.