आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते उदघाटन, रुग्णांना मिळणार सुविधा
मुंबई – समय सारथी
आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियनांतर्गत ‘राष्ट्रीय हिमॅटॉलॉजी’ कार्यक्रम सोहळा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते पार पडला. राज्यातील सर्व जिल्ह्यातील हिमोफिलिया डे-केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले, हिमोफिलिया डे-केअर सेंटर’च्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत. राज्यातील जनतेच्या सेवेसाठी आरोग्य विभाग कार्यतत्पर असून त्यानुषंगाने हीमोफिलिया या आनुवंशिक आजारासाठी प्रभावी व मोफत उपचार मिळावे यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात हिमोफिलीया डे-केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
राज्यातील सर्व जिल्ह्यातील हिमोफिलीया डे-केअर सेंटर्समध्ये हीमोफिलीया उपचारास आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा मोफत पुरविण्यात येणार असून यामुळे हिमोफीलिया रुग्णांना उपचारास मदत मिळणार आहे.
हिमोफिलीया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्सच्या कमतरतेमुळे रक्तस्त्राव होतो. हा आजार वाय गुणसूञाच्या दोषामुळे होत असल्याने प्रामुख्याने पुरुष हे या आजाराने ग्रस्त आढळतात. मात्र स्त्रिया या आजाराच्या वाहक आढळतात. राज्यात अशा आजाराचे अंदाजे ४,५०० रुग्ण आहेत. या आजाराबद्दलची अपुरी माहिती तसेच आजाराचे निदान व उपचारास विलंब होण्याचे प्रमाण लक्षात घेता आरोग्य विभागाने हिमोफिलिया डे-केअर सेंटर्स प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी आमदार समीर कुनावर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रे, सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर, सर्व जिल्ह्यांतील जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नवीन हिमोफिलिया सेंटर्सचे अधिकारी कर्मचारी दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी हिमोफिलिया रुग्णांशी संवाद साधून त्यांचे मनोगत आरोग्यमंत्री यांनी ऐकून घेतले. ही सेवा जिल्हा स्तरावर घराजवळ उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णांनी आरोग्य विभागाचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी या उपक्रमाविषयी महिती दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०१३ पासून हिमोफिलीया रुग्णांसाठी एकूण ९ हिमोफिलीया डे- केअर सेंटर्स सुरू आहेत. मात्र आता राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
रुग्णांना मोफत दिल्या जाणाऱ्या सेवा
हिमोफिलिया रुग्णांसाठी रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी कलॉटिंग फॅक्टर्स उपलब्ध करून देणार. सांध्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि सांधे गतिशील राखण्यासाठी फिजिओथेरपी सेवा.हिमोफिलीया रुग्णांसाठी जीवनशैलीत बदल करण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन.सांधे, मस्क्युलोस्केलेटल, दंत प्रणाली आणि उपचारांची नियमित कालबध्द तपासणी.हिमोफिलिया रोगाविषयी आरोग्य शिक्षण, जागरूकता व समुपदेशन.