बायोमायनिंग घोटाळा प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी मागावीला मुख्याधिकारी यांच्याकडे अहवाल
सभागृहाला दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप – चौकशीला गती येण्याची गरज
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या बायोमायनिंग घोटाळा प्रकरणात तारांकित प्रश्नात सभागृहात दिशाभूल करणारी चुकीची माहिती विद्यमान मुख्याधिकारी यांनी दिली असल्याचा आरोप करीत त्याच्यावर निलंबनाची कारवाईची मागणी आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यावरून जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याकडे वस्तूस्तिथीचा स्वयंस्पष्ट अहवाल स्वरूपात लेखी खुलासा मागावीला आहे. यात तत्कालीन मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, हरिकल्याण यलगट्टे यांच्या काळात हे काम झाल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे तर यात पुणे येथील पथक प्रत्यक्ष पाहणी व चौकशीसाठी कधी येते हे पाहावे लागेल.
2023 च्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी नगर परिषदेच्या बायोमायनिंग प्रकरणात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता त्यात उत्तर देतेवेळी या प्रकल्पात तयार झालेला खत नगर परिषदेच्या उद्यानात टाकण्यात आल्याचे उत्तर दिले होते. सद्य स्तिथीत किती उद्याने व केव्हापासुन चालु आहेत याची माहिती विचारली असता नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी कार्यालयीन अभिलेखानुसार 2 उद्यानाच्या नोंदी असुन त्याचा सध्या वापर नाही असे लेखी उत्तर दिले.
सदर ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची तसदी मुख्याधिकारी यांना घ्यावी वाटली नाही. एकंदरीत शहरातील दोन्ही उद्याने पाहिले असता तेथे दररोज निर्मिती झालेले खत उपयोगी आणणे अशक्य आहे. खताचा कसलाही वापर केला नसुन उद्याने बंद आहेत व 2 कोटी 22 लाख ठेकेदार यांना देण्यात आले. तत्कालीन मुख्याधिकारी व तत्कालीन शहर अभियंता यांना वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक पाठीशी घातले असा आरोप आमदार धस यांनी केला त्यामुळे त्याच्यावर कारवाई करुन त्याचा अहवाल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी द्यावा असे धस यांनी पत्रात म्हंटले आहे त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
फसवणूक व निधीचा गैरवापर प्रकरणात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे हे सध्याएक महिन्यापासुन जेलमध्ये असुन त्यांच्या जामिनीवर 12 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.