आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केली शेतकरी व बेरोजगार तरुणांसह जागेची पाहणी
ढोकी/ धाराशिव – समय सारथी
तेरणाच्या शिल्लक जागेत एमआयडीसी उभारण्यासाठी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी केली आहे. तेरणा साखर कारखाना पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समुहाला भाडेतत्वावर दिला आहे तर कारखाना परिसरातील इतर जमीन उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात आहे, त्यावर आमदार राणा यांनी एमआयडीसीची मागणी केली आहे.
धाराशिव तालुक्यातील ढोकी व परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तेरणा साखर कारखान्याच्या जागेत एमआयडीसी उभारावी यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सावंत यांच्याकडे मागणी करण्यात आली असुन आमदार पाटील यांनी यां भागातील शेतकरी यांची बैठक घेत जमिनीची पाहणी केली.
तेरणा कारखान्याच्या जागेची एमआयडीसीसाठी पाहणी करण्यात आली. ढोकी व परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, शेतकरी,बेरोजगार तरुण उपस्थित होते. तेरणा कारखान्याची जागा सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात आहे. ती जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून या जागेवर एमआयडीसी उभारणीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
एमआयडीसी उभारण्यासाठी आवश्यक जमीन तेरणा कारखान्याकडे उपलब्ध असून येथे रेल्वे स्टेशन, लातूर- मुंबई राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे परिस्थिती अनुकूल आहे. एमआयडीसी निर्मितीमुळे ढोकी व परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल शिवाय या भागाचा आर्थिक विकास साधला जाईल असा विश्वास आमदार राणा पाटील यांना वाटत आहे. एमआयडीसी उभारण्यासाठी उद्योग मंत्री उदय सावंत यांनी प्राथमिक चर्चेत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी म्हणटले आहे.
तरुणांच्या हाताला रोजगार नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जावे लागते. ढोकी येथे एमआयडीसी झाल्यास बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल असे पाटील म्हणाले.