कायमची सेवा समाप्ती, काळ्या यादीत समावेश – घोटाळ्याचे कागदपत्रे गहाळ, गुन्हा नोंद करण्याचे आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर पंचायत समितीमध्ये शेतरस्त्याच्या कामात घोटाळा घालून त्याची मोजमाप पुस्तिका गहाळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पंचायत समिती मधील कंत्राटी तांत्रिक सहायक भागवत मधुकर गुरव याची कायमची सेवा समाप्ती करण्यात आली असून काळ्या यादीत समावेश करण्यात आला आहे. घोटाळा घालून तो उघड होऊ नये यासाठी पुरावा नष्ट करण्यासाठी मोजमाप पुस्तिका गायब केल्या प्रकरणी गुरव यांच्यावर गुन्हा नोंद करावा असे आदेश रोहयो उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.
शिराढोण मसाला रोड ते आळणापुर या रस्त्याच्या कामात घोटाळा घालत अपहार केल्याचा प्रकार घडला आहे. कामाचे मूल्यांकन न करता काल्पनिक मापे नोंद घेऊन हा घोटाळा केला असून तो उघड होऊ नये यासाठी कागदपत्रे गायब केली आहेत. यात कोणा कोणाचा सहभाग आहे हे गुन्हा नोंद झाल्यावर तपासा अंती स्पष्ट होणार आहे. केवळ कंत्राटी कर्मचारी यांच्यावर कारवाई न करता त्यात सहभागी शासकीय वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
शिराढोण मसला रोड ते आळणापुर या रस्त्याचे काम 1 हजार 500 मीटर होते मात्र प्रत्यक्षात हे काम 900 मीटर इतकेच करण्यात आले व 1 हजार 500 मीटर अकुशल कामाचे बिल काढण्यात आले. यातील मोजमाप पुस्तिका 106333 व 137830 यात चुकीच्या नोंदी घेऊन त्या गहाळ करण्यात आल्या.