7 दिवसात निविदा, 3 महिन्यात कार्यादेश तर 91 दिवसात कामाला सुरुवात – रस्त्यामुळे नागरिकांची सोय
धाराशिव – समय सारथी
नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव शहरातील 59 रस्ते व नाली विकास कामांना 140 कोटी मंजुर करण्यात आले असुन याबाबतचा प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय नगर विकास विभागाने काढला आहे. पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी याबाबत पाठपुरावा केला होता त्याला यश आले असुन पालकमंत्री सावंत यांनी याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार मानले आहेत. प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता ही कामे सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला असुन यामुळे धाराशिव शहरवासियांची सोय होणार आहे.
धाराशिव शहरातील 59 प्रमुख डीपी रस्ते व नाली कामे मंजुर करण्यात आले असुन ही कामे 18 महिन्यात पुर्ण केली जाणार आहेत. रस्ते विकास प्रकल्पसाठी 119.49 कोटी रुपये राज्य सरकार देणार असुन नगर परिषदेला नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग म्हणून 21 कोटी रुपये लोकवाटा द्यायचा आहे. प्रकल्पास मंजुरी मिळाली असुन 23 फेब्रुवारी रोजी आदेश काढले आहेत त्यानंतर 7 दिवसात निविदा काढणे व 3 महिन्यात कार्यादेश देऊन 91 दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे बंधनकारक असणार आहे.
मुख्यमंत्री यांनी 20 ऑक्टोबर 23 रोजी धाराशिव शहरासाठी मंजुर केले त्याचा अद्यादेश लवकरच निघेल. मी यासाठी स्वतः मुख्यमंत्री यांना आग्रह धरित पत्र दिले असे मंत्री डॉ सावंत यांनी सांगितले होते त्यानंतर शासन निर्णय काढण्यात आला आहे त्यामुळे आता ही कामे सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धाराशिव जुने गाव व नवीन भागातील ही कामे असुन यात रस्त्यासह नालीचा समावेश आहे.
मला श्रेयवादात पडायचे नाही मात्र मी या कामाचा पाठपुरावा केला होता. धाराशिव जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासुन विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न सुरु असुन आगामी काळात मेडिकल कॉलेज व जिल्हा रुग्णालय उभारणी, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प व इतर कामे करण्यावर भर असुन ही कामे मार्गी लागली आहेत असे मंत्री सावंत यांनी सांगितले.
बॅनरबाजीवरून आमदार राणा पाटील यांच्यावर टीका
आमचा शिवसैनिक रात्र दिवस शहरात मेहनत घेत आहेत मात्र अचानक धाराशिव शहरात बॅनर लागले की 154 कोटी आणल्याबद्दल अभिनंदन, अजुन जीआर निघाला नाही कसले अभिनंदन याचे मला आश्चर्य वाटते, असे सांगत मंत्री डॉ सावंत यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर मुख्यमंत्री यांच्या समोर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास काही बाबी आणून त्या 154 कोटी निधीचा अध्यादेश तात्काळ काढावा अशी मागणी देखील केली. विकासाचा वादा फक्त राणा दादा, दिलेला शब्द पाळणारा खरा नेता.आपलं धाराशिव बदलतंय असे म्हणत खड्डे व धुळीच्या संकटातून शहरवासियांची होणार मुक्ती, धाराशिव शहरातील 59 डीपी रस्त्यासाठी 154 कोटी मंजुर केल्याबद्दल शहरवासियांच्या वतीने आमदार राणा दादांचे मनपूर्वक आभार असे बॅनर लावले आहेत यां बॅनरबाजीवर मंत्री सावंत यांनी थेट टीका केली.