फार्मिंग एअरपोर्ट’ ची केंद्राकडे मागणी – शेती माल 12 तासात परदेशात जाणार
सोलापूर – समय सारथी
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा येथे लोकनेते स्व.आमदार भारतनाना भालके यांच्या जयंती निमित्त भव्य ‘भारत कृषी महोत्सव-2024’ चे आयोजन करण्यात आले असून या कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. ‘भारत कृषी महोत्सव’ अंतर्गत भव्य राज्यस्तरीय कृषी, डेअरी व पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित केले आहे. हा महोत्सव 26 फेब्रुवारी पर्यंत रोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत असे सलग चार दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
आरोग्यमंत्री सावंत म्हणाले की, आजच्या कार्यक्रमात भारतनानांची प्रकर्षाने आठवण झाली. तत्कालीन सरकारच्या काळात नानांच्या व माझ्या कामानिमित्त अनेक वेळा बैठका झाल्या. त्यांच्या शेवटच्या भेटीत आजारी असून देखील नाना कर्तव्यभावनेतून कामाबद्दल माझ्यासोबत बोलत होते. आज भारतनाना असते तर निश्चितच पंढरपूरचे चित्र निराळे दिसले असते असा विश्वास व्यक्त केला.
शेतकरी कुटुंबातील भारत नानांचा वारसा त्यांचे पुत्र भगीरथ भालके उत्तम पद्धतीने चालवत असून हे कृषी प्रदर्शन आयोजित करून नानांच्या जयंतीदिनी त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करत संपूर्ण शेतकरी बांधवांच्या प्रती यामुळे कृतज्ञता व्यक्त केली.
विश्वनेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला देश महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असून लवकरच जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश म्हणून आपल्याला जगात ओळख निर्माण करायची आहे असे सांगितले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याने यात योगदान देत शेतकऱ्यांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे.
येत्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी ‘फार्मिंग एअरपोर्ट’ ची मागणी केंद्र सरकारकडे करणार असून यामुळे शेतातील माल दहा ते बारा तासांच्या आत दुसऱ्या देशात पोहोचून त्याचा मोबदला लगेच शेतकऱ्याला मिळणे शक्य होणार आहे. महायुती सरकार सदैव शेतकरी, कष्टकऱ्यांच्या पाठीशी असून लवकरच विकासाभिमुख निर्णय घेतले जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या कृषी महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले श्री. विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, यशवंत माने (आमदार, मोहोळ), प्रा. शिवाजीराव सावंत (शिवसेना सोलापूर संपर्कप्रमुख), कल्याणराव काळे (सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन), अनिल सावंत (भैरवनाथ शुगर व्हाईस चेअरमन), शिवसेनेचे अमोल शिंदे, पुरोगामी आघाडीचे डॉ. बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश पाटील, युवराज पाटील, लक्ष्मण पवार (मा. व्हाईस चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना) चंद्रकांत भालके आदींसह पंढरपूर, मंगळवेढा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.