मराठा कुणबी नोंदी, कागदपत्रे तपासली जाणार – आज शासनाकडे अहवाल सादर होणार
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिले कागदपत्रे तपासणीचे आदेश
खासरा पाहणी पत्रक, गॅझेट, निजाम व इंग्रजकालीन दस्त, पुरावे ठरणार महत्वाचे
धाराशिव – समय सारथी
मराठा कुणबी असल्याच्या नोंदीचे पुरावे व कागदपत्रे तात्काळ सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी धाराशिवसह मराठवाड्यातील आठही जिल्हाधिकारी यांना दिले असुन त्याप्रमाणे आज अहवाल सादर केला जाणार आहे. अहवाल व कुणबी नोंदीची अभिलेखे आज विशेष दुतामार्फत शासनास सादर केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी यात स्वतः लक्ष घातले असुन पुरावे शोधण्यासाठी महसूल, शिक्षण विभागसह इतर यंत्रणा कामाला लावली आहे.
मराठवाड्यातील मराठा जातीला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असुन इंग्रज व निजाम कालीन महसूली नोंदी तपासल्या जात आहेत. अहवाल देण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व तालुके, गावांच्या अभिलेख्याची तपासणी पुर्ण झाल्याची जिल्हाधिकारी खात्री करतील व त्यानंतर किती तालुक्यात आणि गावातील व्यक्तींच्या खातेदार यांच्या कुणबी नोंदी आढळून आल्या हे देखील अहवालात नमूद केले जाणार आहे.
जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र मागणीचे प्राप्त, मागणीचे प्राप्त एकूण अर्ज, त्यापैकी किती प्रमाणपत्र दिली व नाकारली आणि नाकारण्याची सर्वसाधारण कारणे याचा स्वतंत्र अहवाल देण्यात येणार आहे. धाराशिव तालुक्यातील कारी, कौडगाव, अंबेजवळगे, राजुरी, उतमी कायापूर, येडशी या गावात पुरावे सापडले आहेत.
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी राज्य सरकारकडे 114 पानाचा लेखी अहवाल सादर केला आहे. धारशिव व उमरगा तालुक्यात मराठा हे कुणबी नोंदी असल्याचे पुरावे आढळले असुन धाराशिव तालुक्यात गाव नमुना 14 मध्ये 89 ठिकाणी तर उमरगा तालुक्यात 9 ठिकाणी मराठा हा कुणबी असल्याच्या नोंदी आढळून आले आहेत. महसूली नोंदीचे पुरावे राज्य सरकारकडे 2 दिवसापुर्वी सादर केले असून यात जन्म मृत्यू नोंदी,खासरा पाहणी व इतर महत्त्वाच्या महसुली कागदपत्रावर मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख आढळून आला आहे, आज सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे.
हे पुरावे ठरणार महत्वाचे – नागरिकांनी कागदपत्रे सादर करावीत
1967 पुर्वीचे महसूली पुरावे यात खासरा पत्रक, पाहणी पत्रक, जन्म मुत्यू नोंदी, गावनमुने क व ड पत्रक, कोतवाल बुक, शेतवार पत्रक, शैक्षणिक नोंदीचे पुरावे, निजाम काळातील व अन्य संस्थांनकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्ताऐवज, मराठा समाजातील लोकांची वंशावळ,जिल्ह्याचे गॅझेटीयर, जनगणना नोंदी, अन्य सकारात्मक पुरावे तसेच जिल्हाधिकारी स्तरावरून जिल्ह्यात नागरिकांकडून कुणबी जातीबाबत सनदी किंवा इतर पुरावे उपलब्ध करुन घेऊन त्याचा अभिलेख म्हणून अहवालात समावेश करण्यात येणार आहे त्यामुळे ज्या नागरिकांकडे अशी कागदपत्रे आहेत त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन डॉ सचिन ओम्बासे यांनी केले आहे.