नळदुर्ग – समय सारथी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या मालमत्तेवर लेव्ही साखर प्रकरणी ४ कोटी ९८ लाख ९३ हजार ४५० रुपयांचा बोजा चढविण्यात आला असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत पत्रकार परीषद घेऊन श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी यासंदर्भात माहिती देताना लेव्ही साखर विक्री प्रकरणात आपल्याला नाहक गोवण्यात आल्याचे सांगुन आता आपल्याला न्याय मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परीषदेत बोलताना विकास भोसले म्हणाले की, अशोक जगदाळे यांनी श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन हंगाम २०१०–११ व २०११–१२ चालवुन सदर दोन वर्षांतील शासनास द्यावयाची लेव्ही साखर काळ्या बाजारात विकुन ४ कोटी ९८ लाख ९३ हजार ४५० रकमेस फसवणुक केली. यासंदर्भात उच्च न्यायालय संभाजीनगर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी धाराशिव यांनी अशोक जगदाळे यांच्या नळदुर्ग (रूरल) व अलियाबाद येथील मालमत्तेवर वसुलीकरीता बोजा चढवले आहे.
गेली १० वर्षे मी गुन्हा न करता माझ्याविरुद्ध वरील साखरेची अफरातफर चा गुन्हा दाखल आहे मात्र आता या प्रकरणात खरा गुन्हेगार कोण आहे हे समोर आले असल्याचे विकास भोसले यांनी म्हटले आहे.
अशोक जगदाळे यांची भुमिका –
लेव्ही साखरेचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे. मात्र याप्रकरणी मला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता किंवा मला कसल्याही प्रकारची माहिती न देता केवळ राजकीय द्वेषातुन माझ्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे. या कारवाई विरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. लेव्ही साखरेचा विषय हा कांही कारखान्याचे कामगार, ऊस उत्पादक शेतकरी यांच्याशी निगडीत नाही. मी कारखाना चालवीत असतांना एक रुपयाचेही देणे कुणाचे ठेवले नाही. मात्र कांही जणांना हे बारा वर्षापुर्वीचे प्रकरण नाहक उकरून काढण्याची सवय लागली आहे.योग्य वेळी आपण यामागच्या सुत्रधाराचा भांडाफोड करणार असल्याचे अशोक जगदाळे यांनी म्हटले आहे.