सावंत यांच्यासाठी सुवर्ण योग – जेएसपीएम युनिर्व्हसिटी विधेयक दोन्ही सभागृहात मंजुर तर तेरणेचा ताबा भैरवनाथ समूहाला
उस्मानाबाद – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्यासाठी आजचा दिवस हा दुहेरी सुवर्णयोग देणारा ठरला. डॉ सावंत समूहासाठी खुशखबर असून ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ताबा हा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने भैरवनाथ समूहाला दिला आहे त्यामुळे हा कारखाना आता सुरु होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे सावंत यांच्या जेएसपीएम युनिर्व्हसिटी विधेयक दोन्ही सभागृहात मंजुर झाले आहे. नवीन स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याबाबतचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला असून त्याला मंजुरी मिळाली आहे. हे विद्यापीठ हवेली तालुक्यात उभारण्यात येणार आहे.
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आगामी 25 वर्षासाठी भैरवनाथ उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांना आम आदमी पार्टीने प्रत्यक्ष भेटून तात्काळ संचालक मंडळाने ताबा देणेबाबत विनंती केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तात्काळ जिल्हा बँकेचे एमडी यांना बोलून ताबा देण्याची कारवाई करावी असे आदेश दिले होते त्याची पूर्तता होत जिल्हा मध्यवर्ती बँकेने भैरवनाथ शुगरला तेरणा कारखान्याचा ताबा दिला आहे. ताबा दिल्या नंतर आप पार्टीने त्याबद्दल संचालक मंडळ व जिल्हाधिकारी यांचे मनस्वी आभार मानले.
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ अर्थात जेएसपीएम हे विद्यापीठ २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. मंत्री डॉ सावंत यांनी १९९८ मध्ये जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाच्या शाळा तसेच विविध शाखांमध्ये शिक्षण देणारी महाविद्यालये आहेत. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन क्षेत्रात उच्च शिक्षण देण्याचे काम संस्था करत आहे. संस्थेचा पुण्यात ताथवडे, हडपसर, वाघोली, बावधन, नऱ्हे यांसह पुण्याबाहेर बार्शी येथे कॅम्पस आहे. मंत्रिमंडळाच्या 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार हे विधेयक मांडण्यात आले त्याला मंजुरी मिळाली आहे.