धाराशिव – समय सारथी
500 बेडचे जिल्हा रुग्णालय धाराशिव शहरातील कुष्टधाम येथील 20 एकर जागेवर साकारणार असुन राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी मान्यता आहे. स्वतंत्र शासकीय रुग्णालयामुळे धाराशिव जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था बळकट होणार असुन जिल्हा रुग्णालयासाठी 350 कोटींचा निधी मंजुर केला आहे. आरोग्यमंत्री सावंत यांच्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था सुधारली असुन रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व नवीन मंजुरी मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये व सामान्य रुग्णालये एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या अर्थसहाय्यातून उन्नती करण्याबाबतची व्हिडीओ कॉन्फरन्स सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत व मित्राचे सीईओ प्रविणसिंह परदेशी,आरोग्य आयुक्त व जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये राज्य शासनाने देशपातळीवर 7 धोरणात्मक निर्णय घेतल्याने एशियन डेव्हलपमेंट बँकेने एकूण 4 हजार कोटी रुपयांपैकी 1200 कोटी रुपयांचा पहिला हप्ता राज्य शासनास देण्याचे मान्य केले.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी धाराशिव या आकांक्षित जिल्ह्यातील रुग्णांच्या अडचणीबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केले. प्राप्त निधीतून 500 खाटांचे नवीन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जवळ-जवळ 67 हजार चौ.मिटर जागेवर बांधकाम कर्मचारी निवासस्थानासह टाईप प्लॅनप्रमाणे बांधकाम करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
राज्य शासनाची उपलब्ध कुष्ठधामाची 20 एकर जागा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या सूचनेनुसार लगेच देण्याचे मान्य केले.या जागेची पाहणी 9 फेब्रुवारी रोजी मित्राचे सीईओ प्रविणसिंह परदेशी यांनी करुन जागा योग्य असल्याचेही मान्य केले. याकरीता लागणारे एकूण 350 कोटी रुपये इतका निधी एशियन डेव्हलपमेंट बँकच्या अर्थसहाय्यातून देण्याचेही मान्य करण्यात आले.याकरीता आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा डॉ सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.