धाराशिव – समय सारथी
जिल्हा नियोजन समितीला अतिरिक्त 68 कोटींचा निधी मिळाला असुन पालकमंत्री डॉ सावंत याच्या मागणीला यश आले आहे. जिल्ह्याला आता 408 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली.
पालकमंत्री तथा नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत विविध विकास कामांसाठी अतिरिक्त निधीची मागणी केली होती ती पूर्ण झाली असून जवळपास 68 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 408 कोटी निधी मिळणार असून त्याचे सविस्तर नियोजन शासनास पाठवणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा समितीचे सचिव डॉ सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
आरोग्य, शिक्षण, महावितरण, रस्ते, स्मशान भूमी दुरुस्ती ही कामे केली जाणार असून त्यातील 25 कोटी निधी हा महावितरणला शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी वापरला जाणार आहे. 340 कोटी नियतवे होते त्यात 68 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली असुन आता 408 कोटी रुपयांचा निधी दरवर्षी मिळणार आहे.
जिल्ह्याचे मागासलेपण व दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2024-25 या वर्षात वाढीव निधी देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले त्यानुसार अतिरिक्त निधी मंजुर केला आहे.