असमतोल निधी वाटप – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची पालकमंत्री डॉ सावंत यांच्या विरोधात तक्रार
मंजुरीसाठी शिफारस केलेल्या यादीवर आक्षेप – प्रस्तावित कामात भुम परंड्याला झुकते माप
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधी वाटपावरून पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या सन 2022-23 निधी वाटपाच्या प्रस्तावित कामात इतर मतदार संघाच्या तुलनेत भुम परंडा मतदार संघाला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप करीत असमतोल निधी वाटपाबाबत भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या विरोधात तक्रार केली आहे. पालकमंत्री डॉ सावंत यांनी मंजुरीसाठी शिफारस केलेल्या कामाच्या यादीवर आमदार राणा पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्याकडे लेखी तक्रार करीत निधी वाटप करताना निकषाचे पालन न झाल्याचे म्हणटले आहे. असमतोल दूर करण्यासाठी नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी यांना योग्य त्या सूचना कराव्यात अशी मागणी केली आहे. त्यानुसार उपसचिवानी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देत प्रस्तावित कामांची माहिती मागवली आहे.
सत्तेतील भाजप आमदार व पालकमंत्री यांच्यातील बेबनाव यानिमित्ताने उघड झाला असुन निधी वाटपाचा मुद्दा भविष्यात चांगलाच पेटणार असल्याचे दिसते. पालकमंत्री डॉ सावंत यांचा त्यांच्या मतदार संघात जास्तीत जास्त निधी नेण्याच्या मनसुब्याला या तक्रारीने खो बसणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदार संघात नियमानुसार समसमान निधी वाटप करण्यासाठी आमदार राणा पाटील यांनी आवाज उठवीत पुढाकार घेतला आहे. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा या मतदार संघाना कसे डावलण्यात येत आहे त्याची तुलनात्मक आकडेवारी आमदार पाटील यांनी तक्रारी सोबत दिली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतील कामांना मंजुरी देण्याच्या कार्यप्रणालीबाबत स्पष्टता येण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती 1988 व जिल्हा नियोजन समिती 199 चे उस्मानाबाद जिल्ह्यात पालन झाल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे. कामे योजनेच्या शासन निर्णयातील विहित निकषानुसार प्रस्तावित करण्याच्या सूचनाचेही पालन केले नाही तरी निधी वाटप असमतोल दूर करावा अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेकडील पशुवैद्यकीय दवाखाने व प्रथमोपचार केंद्र बांधणे, ग्रामपंचायतीना जन सुविधेसाठी विशेष अनुदान, मोठ्या ग्रामपंचायतीना नागरी सुविधेसाठी विद्युतीकरणसह विशेष अनुदान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा दुरुस्ती, व्यायाम शाळांचा व क्रिडांगणाचा विकास, तांडा वस्ती सुधार योजना, अंगणवाडी बांधकाम, रस्ते विकास व मजबुतीकरण, ग्रामीण जिल्हा रस्ते विकास व यात्रा स्थळाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या कामांचा समावेश आहे. एकूण निधीपैकी जवळपास 70 टक्केवारी पेक्षा जास्त प्रस्तावित कामे ही भुम परंडा मतदार संघातील आहेत.