एमडी ड्रग्जमुळे तरुणाई नशेच्या विळख्यात, ठोस कारवाईची गरज
धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज विरोधी जनजागृती मोहीम व कारवाईच्या मागणीसाठी युवासेना सोमवारी सकाळी 11 वाजता जिजाऊ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढणार आहे. या मोर्चात एक धाराशिवकर म्हणून सहभागी होण्याचे आवाहन युवासेनेचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांनी केले आहे. दैनिक समय सारथीने धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा व ड्रग्ज माफियाचा शिरकाव झाल्याची बातमी केली होती त्यानंतर परंडा येथे एकाला पकडले, धाराशिवच्या तरुणाईला वाचवण्यासाठी ठोस कारवाई व जनजागृती मोहीम गरजेची आहे.
आपण एक धाराशिवकर म्हणून ड्रग्जला विरोध करण्यासाठी या मोर्चामध्ये सामील होणार का ? धाराशिव जिल्ह्यात एमडी ड्रग्जसारख्या विषारी व्यसनाचा शिरकाव झालाच कसा काय ? याच्या विरोधात युवासेनेच्या वतीने झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी मोर्चा करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबातील पुरुष ,महिला ,विद्यार्थी यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या धाराशिवच्या तरूनाचे भविष्य वाचवा असे आवाहन केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा, तुळजापूर या भागात एमडी ड्रग्जचा शिरकाव झाला असुन तरुणाई नशेच्या विळख्यात सापडली आहे. परंडा येथे एका तस्कराला अटक केली असुन महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तुळजापूर यासह अन्य भागात ड्रग्ज सेवन करणाऱ्याची संख्या वाढली आहे.
‘मेफेड्रोन’ असे नाव असलेला हा अंमली पदार्थ 2 हजार 500 रुपये प्रती 10 ग्रॅम दराने मिळत आहे. मेफ, बबल्स, ड्रोन, म्यॅव म्यॅव आणि एम-कॅट अशी वेगवेगळी नावे आहेत. युवा वर्गाला व्यसनाधीन करणारा हा पदार्थ शरीरासाठी घातक असुन याचे दूरगामी शरीरावर परिणाम आहेत, अनेक तरुण या ड्रग्जच्या नशेच्या आहरी गेलेले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षात गुन्हेगार व गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असुन बोगस दारू तस्करी, ड्रग्ज, बंदूकबाजी, वेश्या व्यवसाय या विश्वात अनेक तरुण गुंतले आहेत. लोकप्रतिनिधी व गावपुढारी, नेत्यांनी ड्रग्जचा सारखा गंभीर विषय राजकारणाच्या पलीकडे जाऊन हाताळणे गरजेचे बनले आहे. ग्रामीण भागात तळापर्यंत ड्रग्जने पाळेमुळे रोवायला सुरुवात केली आहेत, तरुणांच्या भविष्यासाठी त्याला वेळीच आळा घालणे समाजहीतासाठी गरजेचे आहे.
धाराशिव जिल्ह्या शेजारी असलेल्या बार्शी, सोलापूर, पुणे या भागातून ड्रग्ज माफिया पेडलर मार्फत छोट्या 10 ग्रामचे पॉकेट करुन ड्रग्ज पुरवठा करीत आहे. अनेक जणांना हळूहळू नशा व व्यसन लागले आहे. ड्रग्ज आणून देतो असे सांगत काही जणांची यात लाखों रुपयांची फसवणूक झाली आहे मात्र चोरीचा मामला असल्याने सगळे चिडीचुप आहे.