धाराशिव, छत्रपती संभाजीनगर नामांतर ऐतिहासिक पाऊल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्राचे आभार
धाराशिव – समय सारथी
औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली, हे ऐतिहासिक पाऊल आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे खूप खूप आभार अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असेही मुख्यमंत्री म्हणतात.
आठ महिन्यांपूर्वी युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले. त्यानंतर मंत्रिमंडळात दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता तसेच यासंदर्भात विधिमंडळात देखील ठराव संमत झाला होता असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की हे ऐतिहासिक पाऊल असून राज्यातील जनता केंद्र सरकारचे आभारी आहे