यशपालजी सरवदे यांचे निधन – क्रांतिकारी आवाज हरपला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा दिन, दलित, शोषितांच्या अस्मितेचा लढा. विद्यापीठ नामांतराचा ठराव तत्कालीन विधानसभेत सर्वानुमते मंजूर होऊनही, त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यासाठी आंबेडकरी जनतेला निकराची लढाई लढावी लागली. तेंव्हा नामांतर का होत नाही असा सवाल करत, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कडोकोट बंदोबस्तातील प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर झेप घेणारा तत्कालीन निडर ‛पँथर‘ होते यशपाल सरवदे. तेंव्हाचे मुख्यमंत्री होते खुद्द शरद पवार. यशपाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर झेप घेऊन त्यांना हा जाब विचारला होता. सरकारी यंत्रणेची यामुळे अक्षरशः भंबेरी उडाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री तेंव्हा सोलापूर दौऱ्यावर होते. यशपाल सरवदे नावाचे हे बेधडक वादळ, निडर झंझावात आज रविवारी 26 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री कायमचा विसावला आहे. त्यांचे ज्वलंत कर्तृत्व जनमानसात कायम स्मरणात राहील असेच आहे.
अल्पशा आजाराने पुणे येथे त्यांचे निधन झाले. उस्मानाबाद येथील स्मशानभूमीत दुपारच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर बौद्ध धम्म पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुले, जावई असा परिवार आहे.
1997 साली त्यांनी ऐतिहासिक अशी धम्म परिषद उस्मानाबाद येथे घेतली होती. भारतीय संविधानाची प्रास्ताविका भीमनगरातील क्रांतिचौकात आणि नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसविण्यात त्यांचे अविस्मरणीय योगदान आहे.