धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील बहुचर्चित निसर्ग गारवा लॉजवरील वेश्या व्यवसाय प्रकरणातील मुख्य आरोपी नितीन रोहिदास शेरखाने याला छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केले आहे. 24 डिसेंबर रोजी अटक झाल्यापासुन शेरखाने हा जेलमध्ये असुन तब्बल एक महिन्यानंतर दिलासा मिळाला असुन अटींची पूर्तता केल्यावर जेलमधुन सुटका होणार आहे. न्यायमुर्ती संजय देशमुख यांच्या कोर्टाने 50 हजार रुपयांच्या शुअर्टीवर जामीन दिला तसेच साक्षीदार यांच्यावर दबाव टाकू नये व पुराव्याशी छेडछाड करू नये अश्या नियमित अटी घातल्या आहेत.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने सेक्स रॅकेटचा तपास अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाकडे वर्ग करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ हे याचा तपास करीत आहेत.पोलिसांनी शेरखाने याचे बँक व फोन पे रेकॉर्ड मागवले असुन ते आलेले नाही, ते आल्यावर याचा अधिक उलगडा होणार आहे.
आरोपी नितीन शेरखाने याने सदरील लॉज 5 लाख रुपये डिपॉझिट व दरमहा 70 हजार रुपये भाड्याने मॅनेजरला दिल्याचे सांगत 20 सप्टेंबर 2022 रोजीचा एक भाडेकरार कोर्टात जामीन मिळवण्यासाठी सादर केला मात्र 5 लाख डिपॉजिट व दरमहा 70 हजार भाड्याची कोणतेही पुरावे व बँक स्टेटमेंट कोर्टात न दिल्याने हा भाडेकरार पुरावा शेरखाने याला अनैतिक कृत्य व अन्य बेकायदेशीर बाबीपासुन वाचवण्यासाठी ढाल म्हणून तयार केल्याचे निरीक्षण धाराशिव जिल्हा कोर्टाने निकालात नोंदविले आहे.शेरखाने याला वाचवण्यासाठी केलेल्या कागदोपत्री भाडेकराराचा बनाव धाराशिव जिल्हा कोर्टात उघड झाला होता.
निसर्ग गारवा या लॉजवर वेश्या व्यवसाय केला जायचा यात प्रत्येक ग्राहकाकडुन 1 हजार 500 रुपये घेतले जायचे त्यातील 600 रुपये हे पिडीत महिलांना दिले जायचे व उर्वरित 900 रुपये हे मॅनेजरमार्फत शेरखाने याला जायचे. मॅनेजर दिलीप रामदास अडसूळे याला दरमहा 12 हजार रुपये देऊन नौकरीला ठेवले गेले होते शिवाय ग्राहक शोधून आणणारा रिक्षाचालक दलाल बालाजी चंद्रकांत गवळी याला प्रति ग्राहक 300 रुपये दिले जायचे असे समोर आले आहे. अश्या रीतीने शेरखाने याला प्रति ग्राहक 600 रुपये मिळत असत हे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून रेड केली यात त्यावेळी महिला सापडून आल्या, रोख रक्कम,नोंदीचे रजिस्टर सापडले.पोलिसांना लॉजवरील नोंदीचे रजिस्टर मिळाले असुन त्यात कोण कोण लाभार्थी आहे याचा तपास सुरु असुन ती नावे तूर्तास गुलदस्त्यात आहेत. पिडीत महिलांची सुटका करुन भादंवि कलम 370, 370 (अ) (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम 3, 4, 5 अन्वये शेरखाने, मॅनेजर व दलाल याच्या विरोधात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.