डॉ शेंडगे याला तात्काळ अटक करा – फरार घोषित करुन संपत्ती जप्त करण्याचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी के एम प्रसन्ना यांचे आदेश
धाराशिव पोलिसांवर डॉ शेंडगे भारी – गेली 15 महिन्यापासून फरार राहण्यात यशस्वी
धाराशिव – समय सारथी
रूग्णांची आर्थिक फसवणुक व चुकीची वैद्यकीय सेवा देऊन त्यांची आणि शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी उमरगा येथील शेंडगे हॉस्पिटलचे डॉ आर डी शेंडगे यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक के एम प्रसन्ना यांनी दिले आहेत. डॉ शेंडगे सापडत नसल्यास त्यांना सीआरपीसी कलम 82 व 83 अंतर्गत फरार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. 12 ऑक्टोबर 2021 रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास गेली 15 महिन्यापासून डॉ शेंडगे फरार आहेत.
डॉ शेंडगे याचा दैनंदिन व्यव्हार सुरुळीत असून उमरगा शहरात डॉ शेंडगे यांचे अनेकांना सहज दर्शन होते मात्र ते पोलिसांना सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच आज थेट विशेष पोलिस महानिरीक्षक प्रसन्ना यांच्या पत्रकार परिषदेत हा विषय निघाल्यानंतर त्यांनी वरील आदेश दिले. यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत उपस्थित होते.
चुकीची वैद्यकीय सेवा लुटीतील व विविध योजनाच्या नावाने शासनाचे लाखो रुपये लुटणाऱ्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार व आरोपी डॉ आर डी शेंडगे हे गुन्हा नोंद झाल्यापासुन फरार आहेत. डॉ अशोक बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420,465,468,471,34 सह गुन्हा नोंद झाला आहे. डॉ शेंडगे यांनी 2015 पासुन 6 सप्टेंबर 2019 पर्यंत रुग्णांची बनावट कागदपत्रे सादर करीत विमा कंपनीकडुन लाखो रुपयांचे बिल हडप केले असे चौकशी अहवालात उघड झाल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेंडगे यांची अटकपूर्व जामीन 2 वेळेस जिल्हा सत्र न्यायालयाने तर 2 वेळेस औरंगाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणात डॉ शेंडगे विरोधात कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले असून गुन्हा नोंद झाल्यापासून आजवर जवळपास 3 तपास अधिकारी बदलले, पोलिस अधीक्षक बदलले तरी ते डॉ शेंडगे यांना अटक करू शकले नाहीत. डॉ शेंडगे हे पोलिसांना सापडत नसल्याने धाराशिव पोलिस दलाचे खच्चीकरण होत आहे.