धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील बहुचर्चित खुन प्रकरणात 2 आरोपीना कलम 302 अंतर्गत न्यायाधीश विश्वास मोहीते पाटील यांनी दोषी ठरविले असुन 24 जानेवारी बुधवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.रामचंद्र येडगे व हरीश माशाळे अशी दोषी आरोपींची नावे असुन त्यांच्यावर 2020 मध्ये खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. दोघांना दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
नळदुर्ग येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला नियमबाह्य रित्या जामीन देण्यासह विविध तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश गोपाळ अग्रवाल यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. न्यायाधीश, सरकारी वकील व इतरांनी संगणमत करुन उच्च न्यायालयाने जामीन बाबत काही लेखी सुचना व आदेश दिलेले असतानाही ते आदेश बाजूला ठेवून अग्रवाल यांनी खुनातील आरोपीला जामीन दिली.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी स्वतः पुढे येऊन आरोपीचा जामीन स्वीकारण्याचे नाकारले त्यानंतर आरोपीने त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले, तेव्हा उच्च न्यायालयाने प्रमुख न्यायाधीश शेंडे यांनी स्वतः घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करीत कडक शब्दात ताशेरे ओढले त्यामुळे हा खुन खटला राज्यभर चर्चेत आला होता, त्याच प्रकरणात कोर्टाने 2 आरोपीना दोषी ठरविले आहे. बुधवारी त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.