वादळी पत्रकार परिषद – माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना पश्चाताप, मंत्री सावंत यांच्यावर हल्लाबोल
सावंतांच्या पैशाचा अन् सत्तेचा माज जनता उतरवेल – खुले आव्हान, संघर्ष वाढणार
परंडा – समय सारथी
राजकारणात कोणी कोणाचा कायम मित्र आणि शत्रू नसतो याचा प्रत्यय सध्या जिल्ह्यात येत आहे. शिवसेनेत ठाकरे व शिंदे गट पडून सत्तातर झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यात धुसफूस, सत्ता संघर्षाचे राजकारण तर गरजेनुसार खांद्यावर हात टाकत गोंजारण्याचे प्रकार सुरु आहेत. एकेकाळी सोबत असलेले माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व मंत्री सावंत परिवारात राजकीय मुद्यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. ज्यांना राजकारणात आणले त्यांनीच घात केला असे सांगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी पश्चाताप व्यक्त केला तसेच आगामी काळात जशास तसे उत्तर देऊ व जिल्ह्यात आणलेले हे पार्सल परत पाठवून देऊ, त्यांनी मला डवचले आहे त्यांना सोडणार नाही, असे पाटील म्हणाले. सावंत गटाकडून याला कसे उत्तर दिले जाते याकडे लक्ष लागले आहे.
पाटील यांची पत्रकार परिषद आरोप प्रत्यारोपमुळे एकप्रकारे राजकीय दृष्ट्या वादळी ठरली. माजी आमदार पाटील हे सत्ता नाट्यानंतर मंत्री सावंत यांना भेटले होते त्यावेळी पाटील हे सावंताच्या गळाला लागले अशी चर्चा झाली मात्र त्यानंतर पाटील हे सावंताच्या कळपात न गेल्याने त्यांना संचालक पद गमवावे लागले आणि उघड वाद पेटला.
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत, धनंजय सावंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाचे नोटीस पाठवून अपात्र केले. आजारपणात त्रास देणाऱ्या सावंतांच्या पैशाचा अन् सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला थोडी लाज असेल व इतकी खुमखूमी असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि मध्यवर्ती निवडणुकीला सामोरे जा, मग जनता ठरवेल त्यांना कोणता नेता पाहिजे. ते आम्ही मान्य करु, असे खुले आवाहन पाटील यांनी केले.
ज्यांना बोटाला धरून जिल्ह्याचे राजकारण शिकवल, राजकारणात संधी दिली. त्यांनीच माझ्या आजारपणाचा फायदा घेऊन रुग्णालयातील आयसीययुमध्ये असताना उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचे नोटीस पाठवून त्रास देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. सावंत यांनी कपटी राजकारण केले, सावंत यांनी कपटाने रचलेला डाव तालुक्यातील जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. जनतेच्या आर्शिवादाने माझी प्रकृती ठणठणीत आहे. सावंतांच्या खांद्यावर गुलाल टाकण्याच पहिलं काम मी केले होते त्यासाठी स्वतःच्या भावाला जिल्हा परिषदेची उमेदवारी न देता धनंजय सावंत यांना दिली, निवडून आणलं जिल्हा परिषदेत सभापती केले त्यावेळी डॉ तानाजीराव सावंत आमदारही नव्हते. ही तुमची कुठली नीतिमत्ता असा सवाल केला.
माझ्या नशिबात धोका दिलेला हा पहिला माणूस आहे. उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे सावंत निवडून आले.तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना आणला त्यावेळी सावंताना आलेल्या सगळ्या अडचणी सोडविण्यासाठी अनेकांचा विरोध पत्करून पुढाकार घेतला त्यांनी शेतकरी यांच्या बाबतीत काय केले हे योग्यवेळी उघड करेल असे त्यांनी सांगितले.ज्यांनी हाताला धरून उभे केले त्यांनी आपल्याला त्रास देण्याची भूमिका घेतली. मी सर्व पक्षांना एकत्र आणून आवाहन करणार आहे, सावंताना पाठिंबा देऊ किंवा घेऊ नका.
सावंत यांनी मला व माझ्या कुटुबियांना त्रास देण्याच्या दृष्टीने शासकीय कर्मचाऱ्यावर दबाव टाकून तथ्यहीन प्रकरणात खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात माझ्यासह मुलांवर खोट्या केसेस करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ता येत असते जात असते सत्तेचा माज येवू द्यायचा नसतो, सावंताना आलेला पैश्याचा अन् सत्तेचा माज थोड्याच दिवसात जनता उतरवेल असे सांगत त्यांनी सावंत यांना खुले आव्हान दिले. या पत्रकार परिषदेला शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख गौतम लटके, रणजित पाटील, जनार्धन मेहेर, शिवाजी कदम, रईस मुजावर आदी उपस्थित होते.
मंत्री सावंत यांच्या संस्थानाला आता भुम परंड्यात आव्हान
सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे जिल्ह्यातील नेते आहेत. उमरगा येथील आमदार ज्ञानराज चौगुले हे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घनिष्ठ आल्याने मंत्री सावंत यांच्यापासुन पहिल्यापासुन चार हात सुरक्षित अंतर ठेवून आहेत तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व इतर नेत्यांचे राजकीय आव्हान आहे. सावंत यांचे धाराशिव शहरातील प्रस्थ वाढल्याने त्यांच्या संस्थानाला भाजप आमदार राणा पाटील यांच्याकडून उघडपणे विरोध होत आहे. साखर कारखानदारीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातुन धाराशिव जिल्ह्यात आलेले सावंत हे सुरुवातीला व्यापारी बनून आले. इथली मानसिक, राजकीय व आर्थिक पोकळी ओळखुन राजकारणात उतरले आणि अर्थकारणाच्या जोरावर आता ते इथले राजकीय सत्ताधीश झाले. आगामी काळात सावंत यांना अनेक पातळीवर विरोध होणार असल्याचे आजच्या पत्रकार परिषदनंतर बोलले जात आहे.