कळंब – समय सारथी, अमर चोंदे
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असुन त्यांचे जिल्हाभरात भावी खासदार असे बॅनर लावले आहेत. कळंब शहरात “भावी खासदार धनंजय सावंत” असे बॅनर लावण्यात आले. कळंब शहरातील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन धनंजय सावंत यांनी करुन आजपासुन लोकसभा निवडणुकीच्या कामाचा श्रीगणेशा केला, श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त साधत सावंत यांनी एक प्रकारे प्रचाराचा नारळच फोडला.
धनंजय सावंत यांच्या उमेदवारीसाठी पुणे येथे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली, या बैठकीत एकमुखाने धनंजय सावंत यांना उमेदवार म्हणून तिकीट मागण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यानंतर तात्काळ यंत्रणा पुर्ण ताकतीने कामाला लागल्याचे दिसते.
धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, बांधकाम सभापती असुन ते जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय आहेत शिवाय दांडगा जनसंपर्क व सर्वपक्षीय नेत्यांशी जवळीक आहे. शिवजल क्रांती, भैरवनाथ साखर कारखाना, जिल्हा परिषद व इतर स्थानिक निवडणुका याच्या माध्यमातुन धनंजय सावंत यांचा जनसंपर्क तळागाळातील कार्यकर्त्यात आहे.
कळंब येथील कार्यक्रमाला अनिल खोचरे, संजय नाना गाढवे,गौतम लटके, विलास पाटील,भारतीताई गायकवाड,अमरिन शेख, संजय मुंदडा ,भुम तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ हे पदाधिकारी उपस्थित होते व शहरातील सागर मुंडे, सुधार भंवर,मंदार मुळीक, शकील काजी, वाघमारे शंकर, महेश पुरी बिटु पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
तेरखेडा येथील एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात धनंजय सावंत यांचा उल्लेख भावी खासदार असा करण्यात आला शिवाय कार्यकर्ते यांनी भावी खासदार धनंजय सावंत यांचा विजय असो अश्या घोषणा दिल्या. त्यानंतर धनंजय सावंत यांनी त्याच्या भाषणात म्हणाले की मी अजुन तरी कोणाकडे माझ्या मनातील लोकसभा लढवायची इच्छा कोणाकडे व्यक्त केली नाही पण निश्चित युवकांचे जे प्रेम आहे ते वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहचेल, असे मला वाटते, घडल तर घडलं. मी प्रत्येक कार्यकर्त्याला कुटुंबाप्रमाणे वागावतो, माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे असे सावंत म्हणाले.
राज्यासह जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री तानाजीराव सावंत यांची भुमिका महत्वाची राहिली आहे, ते किंगमेकर व जाईंट किलर म्हणून ओळखले जातात. महायुतीत धाराशिवची जागा ही परंपरागत शिवसेनेकडे राहिली आहे शिवाय मंत्री सावंत यांनी या जागेवर दावा ठोकला आहे. त्यातच त्यांचे पुतणे हे आता इच्छुक असल्याने कार्यकर्त्यांत नवंचैतन्य पसरले असुन त्यांनी भुम परंडा, वाशी या भागात आतापासुनच कामाला सुरुवात केली आहे.